डेंगीने घेतला शिक्षकाच्या मुलाचा बळी

डेंगीने घेतला शिक्षकाच्या मुलाचा बळी

वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील उपराजधानीला लागून असलेल्या वानाडोंगरी नगर  परिषद परिसरातील वैभवनगर, महाजनवाडी येथे डेंगी या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. परिसरातील पाच ते सहा रुग्ण या आजारातून उपचारानंतर कसेबसे बरे झाले. कोकाटे ले-आउट परिसरात राहणाऱ्या चहांदे या शिक्षक दाम्पत्याच्या अकरावीत शिकणाऱ्या तन्मयचा मंगळवारी (ता.१९) डेंगी आजाराने मृत्यू झाला. त्याची बहीण गेल्या दहा दिवसांपासून आजारी आहे.

महाजनवाडी येथील कोकाटे ले-आउट परिसरात वसंता चहांदे दोन वर्षांपासून राहायला आले. ते कळमेश्‍वर तालुक्‍यातील सुसुंद्री येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी  अनिता चहांदे या त्याच तालुक्‍यातील नांदीखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना तन्मय व डिंपल अशी दोन अपत्ये आहेत. डिंपल ही आठ ते दहा दिवसांपासून डेंगी या आजाराने त्रस्त असून तिच्यावर नागपूरला उपचार सुरू आहेत. सोमवारी तन्मयची अचानक प्रकृती बिघडल्याने परिसरातील दवाखान्यात उपचार करून औषध घेतले. लगेच दुसऱ्या दिवशी त्याची तब्बेत जास्त झाल्याने लता मंगेशकर रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वीच काळाने तन्मयला हिरावून नेले. मुलीच्या तब्येतीकडे लक्ष देत असतानाच मुलाकडे दुर्लक्ष झाले. त्यात वडिलांचे निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू होते.

रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नीलडोह उपचार केंद्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्यसेविका भारती माडेकर व त्यांच्या दोन्ही मुलांना डेंगी झाला. माडेकर या एका खासगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. त्यांचा मुलगा अंकुश हा अमेय हॉस्पिटलमध्ये भरती आहे. वानाडोंगरी ग्रामपंचायतची नगर परिषद झाली. पैसा उपलब्ध आहे. परंतु, राबविणारी यंत्रणा नसल्याने परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पावसामुळे जागोजागी खाली भूखंडावर घाणीचे साम्राज्य असून निवेदन देऊन स्वतःचे फोटो काढून बातमी वर्तमानपत्रात छापण्यासाठी स्पर्धा लागली आहे. असे नेते जनतेच्या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. मागील ऑगस्ट महिन्यापासून शिक्षक कांदू पुंजाराम काळे(वय ३७) हे २८ ऑगस्टपर्यंत आजाराने त्रस्त असून ते उपचार घेत आहेत. सिटी हॉस्पिटलमध्ये ते भरती होते. अदिती तुकाराम पिसे, आरोही नितीन गुरुमुखी (वय ८) हिलासुद्धा डेंगी झाला होता.  वैभव रामदास गिरडकर(वय१७, वैभवनगर) हा कोलंबिया हॉस्पिटल, धंतोली येथे १२ ते १८ सप्टेंबरपर्यंत आजारी होता. वेळीच दखल घेतल्याने उपचार घेऊन तो बरा झाला.

कुष्ठरोगाच्या सर्वेक्षणाला प्राधान्य? 
वाडी नगर परिषद क्षेत्रात गत १५ दिवसांपासून डेंगीने नागरिकांना त्रस्त केले. रुग्णांनी शंभरचा आकडा पार केल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण असताना प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाडने कुष्ठरोगाच्या सर्वेक्षणावर भर दिला आहे. ५ ते २०सप्टेंबरपर्यंत सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. या विषयी माहिती घेतली असता डेंगीचे सर्वेक्षण सुरू असल्याची चुकीची माहिती देण्यात आली.१४ ते १६ सप्टेंबरपर्यंत थातूरमातूर सर्वेक्षण केले. शुभारंभ सोसायटीमध्ये तापाचे ३ रुग्ण दाखविण्यात आले. मात्र, याच वसाहतीत माडेकर परिवारातील ३ सदस्यांना व राजेंद्र मस्केंकडे एक रुग्णाला डेंगीची लागण झाली आहे. वेळीच उपाययोजना केली असती तर डेंगीला रोखता  आले असते. मात्र, नगर परिषद व जिल्हा परिषदेने फक्त कागदावर सर्वेक्षण करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला. आता या विरुद्ध स्थानिक पीडित कुटुंब नगर परिषद व जिल्हा परिषदेला जाब विचारणार आहे. 

वाडी परिसरात डेंगी पसरलाच कसा?
वाडी - नगर परिषद क्षेत्रात मागील १५ दिवसांपासून डेंगीने नागरिकांना त्रस्त केले. त्यामुळे शांत असलेल्या काँग्रेसला नागरिकांची ही स्थिती बघितल्या न गेल्याने सर्व पदाधिकारी व  अधिकाऱ्यांना पूर्व सूचना देऊन बुधवारी मोठ्या संख्येने नगर परिषद कार्यालयात धडक देऊन डेंगी वाडी परिसरात कसा पसरला, अशी विचारणा करीत पदाधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले.  मुख्याधिकारी राजेश भगत हे नागपूरला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला गेल्यामुळे उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांनी काँग्रेसचे निवेदन स्वीकारले.

या चर्चेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंगीमुळे अनेक नगरात घबराहट पसरल्याचे सांगून विविध खासगी रुग्णालयात ताप व इतर डेंगीचे रुग्ण आढळले. अनेक रुग्ण उपचारासाठी नागपूर व लता मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. वाडीत नगर परिषद तसेच व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वेळेत उपाय करण्यात आले नाहीत. त्यामुळेच हा आजार वाडीत पसरला. याला नगर परिषद जबाबदार आहे. उपमुख्याधिकारी सहारे यांनी सांगितले की न. प. कडे दोनच फॉगिंग मशीन आहेत.

मात्र, या आशा वर्करकडे काहीही साधने नसल्याची बाब काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केली. एकूणच नगर परिषदेने वेळेत उपाय सुरू केले नाही, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने धडक मोहीम सुरू करण्याची मागणी केली. ‘सकाळ’ ने १३ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केलेली बातमी ‘वाडीत डेंगी व स्वाइन फ्लूची दहशत’ या बातमीचा उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी वाडी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे, शहर अध्यक्ष शैलेश थोराणे, उपाध्यक्ष प्रशांत कोरपे, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अश्‍विन बैस, माजी पं. स. सभापती प्रमिलाताई पवार, माजी सरपंच भीमराव लोखंडे, बेबीताई ढबाले, नागोराव गवळी, किशोर नागपूरकर, गौतम तिरपुडे, निशांत भरबत, पुरुषोत्तम लिचडे, भीमराव कांबळे, शेषराव ठिसके, योगेश कुमकुमवार, विनोद पोहणकर, आशीष पाटील, गणेश बावणे, नामदेव चौरे, मंगेश भारती, गोपाल वरठी, काळमेघ आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com