मानवी प्रगतीत साहित्याचे महत्त्व मोठे - नितीन गडकरी

वणी - विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात विचार व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
वणी - विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात विचार व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

वणी - (राम शेवाळकर परिसर) : मानवी जीवनात साहित्य, संगीत, कला, पत्रकारितेचे मोठे महत्त्व आहे. भौतिक प्रगतीसोबतच आपले मनही संस्कारी करण्याचे कार्य साहित्यिक, कवी, लेखक व पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळेच साहित्य संमेलने हे संस्कृती, उद्‌बोधन, व्यक्तिमत्त्व विकास व लोकसंस्काराचे केंद्र ठरतात, असे मत केंद्रीय भूपृष्ठ आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (ता. २१) ते बोलत होते.

याप्रसंगी स्व. धु. गो. उपाख्य बाबासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आशुतोष शेवाळकर, दैनिक ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे, श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रकाश एदलाबादकर, विलास देशपांडे, वामन  तेलंग, शुभदा फडणवीस, गजानन कासावार, ॲड. देवीदास काळे, डॉ. भालचंद्र चोपणे,  माधवराव सरपटवार, नरेंद्र नगरवाला, डॉ. दिलीप अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, डोळ्यांच्या मागे दडलेला विचार महत्त्वाचा आहे. आणीबाणीत साहित्यिकांनी आयुष्य पणाला लावले. लोकशाही पुनर्स्थापित होताच ते बाजूला झाले. त्यांचा संघर्ष हा लोकशाही वाचविण्यासाठी होता, असे श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले. मानवी जीवनात साहित्य, कला, संगीताला मोठे स्थान आहे. स्थित्यंतरावर त्याचा प्रभाव पडतो. शब्दांवर विश्‍वास ठेवून लोक पुढे जातात. देश प्रत्येक क्षेत्रात विकासाकडे जात असून, त्यात तरुण पुढे आहे. शिक्षण, सेवा, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गुणवत्ता कोणत्याही जात किंवा पंथाचा एकाधिकार नाही.

साहित्यिकांमध्ये मतभिन्नता असावी, मात्र मनभिन्नता नसावी, अशी अपेक्षा श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. आनंदी जीवनाच तत्त्वज्ञान साहित्यात आहे. मराठी साहित्य श्रेष्ठ आहे. साहित्य, संगीत, नाटक, भावगीतांची महती राज्याबाहेर गेल्यावरच कळते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांनी प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन डॉ. स्वानंद पुंड यांनी तर आभार राजाभाऊ पाथ्रटकर यांनी मानले.

बहुगुणीनगरीच्या सुपुत्रांचा सत्कार
कापूस व कोळशासाठी प्रसिद्ध असलेल्या वणीने कला, साहित्य, नाट्य, पत्रकारिता क्षेत्राला अनेक रत्ने दिली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बहुगुणीनगरीतील अशा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुपुत्रांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यात  दैनिक ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे पत्रकार अविनाश महालक्ष्मे, अजय देशपांडे, डॉ. देवानंद सोनटक्‍के, गौरव खोंड, सुदर्शन  बारापात्रे, शेखर वांढरे, प्रल्हाद ठग आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com