विदर्भात उष्णतेची लाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - दोन दिवस तापमानाने थोडीफार उसंत घेतल्यानंतर विदर्भात पुन्हा उन्हाची जोरदार लाट आली आहे. उपराजधानीत पाऱ्याने चोवीस तासांत दोन अंशांची झेप घेऊन चालू उन्हाळ्यातील 42.6 अंश सेल्सिअस नवा उच्चांक नोंदविला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 43.8 इतकी करण्यात आली. 

नागपूर - दोन दिवस तापमानाने थोडीफार उसंत घेतल्यानंतर विदर्भात पुन्हा उन्हाची जोरदार लाट आली आहे. उपराजधानीत पाऱ्याने चोवीस तासांत दोन अंशांची झेप घेऊन चालू उन्हाळ्यातील 42.6 अंश सेल्सिअस नवा उच्चांक नोंदविला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 43.8 इतकी करण्यात आली. 

गेले दोन दिवस उन्हाची तीव्रता किंचित कमी झाली होती. मात्र, मंगळवारी सूर्यनारायणाने अचानक उग्र रूप धारण केले. विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी वर सरकला. 25 मार्चला 42 अंशांवर गेलेले कमाल तापमान दोन दिवसांत 40.4 अंशांपर्यंत घसरले. मात्र, चोवीस तासांत पाऱ्याने पुन्हा दोन अंशांनी झेप घेत प्रथमच बेचाळीशी पार केली. मंगळवारी नोंद झालेले 42.6 अंश सेल्सिअस इतके तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरले. वाशीमचा अपवाद वगळता सर्वच शहरांमध्ये कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली. 

उन्हाचे सर्वाधिक चटके अकोलावासींना बसले. येथे मंगळवारी तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढून उच्चांकी 42.6 अंशांवर गेले, जे विदर्भातच नव्हे, अख्ख्या मध्य भारतात सर्वाधिक ठरले. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात उन्हाची जोरदार लाट निर्माण झाली असून, उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

कमालीची अस्वस्थता 
गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळपासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. सूर्य जसजसा डोक्‍यावर येतो, तसतशी उन्हाची दाहकता वाढते. मंगळवारी दुपारच्या सुमारास उकाड्यामुळे कमालीचे अवस्थ वाटत होते. गरमीमुळे पंखेही प्रभावहीन जाणवत होते. उन्हामुळे थंडपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली असून, एसी, कुलर, गॉगल, स्कार्फ आणि कॅप्सची मागणी वाढली आहे. उन्हाच्या लाटेची शहरात दिवसभर चर्चा होती. 

भिरा देशात सर्वाधिक "हॉट' 
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद रायगड जिल्ह्यातील भिरा येथे करण्यात आली. येथे पारा तब्बल 45 अंशांवर गेला. सोमवारीही येथे कमाल तापमान 46.5 अंशांवर गेले होते. 

नागपुरात तिसऱ्यांदा 41 पार 
यावर्षीचा उन्हाळा अकोल्याप्रमाणे नागपूरसाठीही विक्रमी ठरला आहे. उपराजधानीत गेल्या पाच दिवसांत तिसऱ्यांदा कमाल तापमान 41 अंशांपेक्षा अधिक गेले. यापूर्वी 24 मार्चला 41.5 अंश सेल्सिअस आणि 25 मार्चला 42.0 अंश सेल्सिअस अंशांवर पारा गेला होता. मार्च महिन्यात तीनवेळा 41 अंशांपेक्षा तापमान जाण्याची गेल्या दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे ताठे यांनी सांगितले. अकोला येथेही दशकातील नवा विक्रमाची नोंद करण्यात आली. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

शहर तापमान 
अकोला 43.8 
चंद्रपूर 43.2 
वर्धा 42.9 
नागपूर 42.6 
ब्रह्मपुरी 42.5 
अमरावती 41.6 
यवतमाळ 41.5 
गोंदिया 41.0 
बुलडाणा 40.6 
वाशीम 38.2 

Web Title: Vidarbha heatwave