विदर्भात 137 वाघांचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

यंदा स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांना वन्यप्राण्यांचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे स्वयंसेवक खूश होते, मात्र, फायर वॉचर वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे दु:ख आहे. त्याला शासकीय मदत केली जात आहे

नागपूर - बुद्धपौर्णिमेला पाणवठ्यांवर सलग 24 तास केलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत विदर्भात 137 वाघ आणि 79 बिबट्यांचे थेट दर्शन वन्यजीव स्वयंसेवकांना झाले. 10 आणि 11 तारखेला वन्यप्राणी गणना करण्यात आली होती. त्यात 1200 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. पेंच व्याघ्रप्रकल्पात काही उत्साही तरुणांनी आपल्या सोबत दारू बाळगल्याने त्यांना गणनेत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला. ही आतापर्यंतच्या करण्यात आलेल्या गणनेतील पहिलीच घटना आहे.

137 वाघांचे प्रत्यक्ष दर्शन झाले असले, तरी तेवढे वाघ असतीलच असेही नाही. त्यातील काही वाघ एका मचाणावर दिसल्यानंतर भ्रमंती करताना दुसऱ्या ठिकाणी गेले असतील तर तेथेही त्यांची नोंद होऊ शकते. त्यामुळे त्यांची पुन्हा गणना होण्याची शक्‍यता असते. ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा, बोर या व्याघ्रप्रकल्पांसह इतरही अभयारण्यांत स्वयंसेवकांना वाघासह सर्वच प्राण्यांना प्रत्यक्ष पाहण्याची चांगली संधी मिळाली. याबद्दल बोलताना ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक जी. व्ही. गरड म्हणाले की, यंदा स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांना वन्यप्राण्यांचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे स्वयंसेवक खूश होते, मात्र, फायर वॉचर वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे दु:ख आहे. त्याला शासकीय मदत केली जात आहे. वन सचिवांनी आज घटनास्थळाला भेट दिली आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वाघांनी प्रत्यक्ष सहा ठिकाणी दर्शन दिले. बिबट्यांची अनेक ठिकाणी नोंद झालेली आहे. त्याचा आकडा जुळवला जात आहे. पूर्ण माहिती प्राप्त होण्यासाठी थोडा कालावधी लागेल, अशी माहिती उपवनसंरक्षक अमलेंद्रू पाठक यांनी दिली. पेंच व्याघ्रप्रकल्पात यंदा 350पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यातील चार स्वयंसेवकांनी नियमांची पायमल्ली करून सोबत दारू बाळगल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना गणनेत सहभागी होण्यास मज्जाव केला. त्यांची गणनेतून हकालपट्टी करण्यात आली, असे क्षेत्र संचालक हृषिकेश रंजन यांनी सांगितले.

प्रकल्प......... वाघ............बिबट....... तृणभक्षक
पेंच......... 36......... 7 ......... 3826
उमरेड कऱ्हांडला.........4......... निरंक ......... 404
बोर......... 6......... 10 ......... 658
टिपेश्‍वर ......... 3......... निरंक ......... 111
पैनगंगा ......... निरंक ......... 6......... 100
मेळघाट ......... 20......... 50 ........ अप्राप्त
ताडोबा ......... 62......... 15......... अप्राप्त
नवेगाव-नागझिरा ......... 6 ......... अप्राप्त