विदर्भाचा सर्वाधिक विकास - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

suresh prabhu
suresh prabhu

नागपूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी नागपूर विभागातील सुमारे 20 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यात नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा समावेश आहे. नागपूर देशाच्या हृदयस्थानी वसले असल्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावाद प्रभू यांनी व्यक्त केला.

मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार अजय संचेती, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रकाश गजभिये, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार नाना शामकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंग सोईन यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

सुरेश प्रभू म्हणाले की, अडीच वर्षांत रेल्वेच्या पायाभूत विकासासाठी तब्बल साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. महाराष्ट्राला 3 हजार 600 कोटी देण्यात आले आहेत. राज्यभरात 1 लाख 36 हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. विदर्भात मार्गांचे दुहेरी, तिहेरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. येणाऱ्या काळात पीपीपी तत्त्वावर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येईल.

अजनी-पुणे एक्‍स्प्रेसचा शुभारंभ
नागपूर स्थानकावरील सोहळ्यातून मान्यवरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून अजनी-पुणे सुपरफास्ट वातानुकूलित साप्ताहिक गाडीचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नागपूर-अमृतसर व अमरावती-पुणे साप्ताहिक एक्‍स्प्रेस सुरू करण्याची घोषणा केली. चंद्रपूर व बल्लारशा स्थानकाचे विकासकार्य, नागपूर, बल्लारशा, वर्धा आणि सेवाग्राम स्थानकावरील एलईडी लाइट व्यवस्था, नागपूर स्थानकावरील मोफत वायफाय, नागपूर-इटारसी, वर्धा-बल्लारशा थर्डलाइन, नागपूर-वर्धा तिसरा आणि चौथा मार्ग, नागपूर स्थानकावरील लिफ्टसहित एफओबी, गोधनी-कळमना डबलिंग, अजनी सॅटेलाइट टर्मिनस, अजनी स्थानकावरील रिसायकलिंग प्लांट व मॅकेनाइज्ड लॉंड्री, गोधनी स्थानकाचा विकास, वडसा-गडचिरोली नवीन मार्ग, इतवारी स्थानकावरील कोचिंग डेपो आणि मोतीबाग कार्यशाळेचा विकास आदी कामांचे भूमिपूजन झाले.

रेल्वेप्रकल्पांसाठी संयुक्त कंपनी
महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकार यांची संयुक्त कंपनी तयार करण्यात येत आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याकडूनही रेल्वेप्रकल्पांना सहकार्य मिळत आहे. बल्लारशा, चंद्रपूरमार्गे काझीपेठ-पुणे गाडी सुरू करण्यासह चंद्रपूर-नागपूरदरम्यान रेल्वे चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गावांना जोडा - नितीन गडकरी
शेतमाल कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील मोठी गावे जोडणारी रेल्वे सुरू व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, मल्टीमॉडेल हब, आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण होत आहे. कळमेश्‍वर, रामटेक, बुटीबोरी, सावनेरला जोडणारी रेल्वे सुरू करून मेट्रोची कनेक्‍टिव्हिटी द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com