अमरावती कारागृहामध्ये कैद्यांसाठी "व्हिडिओ कॉलिंग' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अमरावती - मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृह या कक्षेत येणारे पुरुषबंदी; तर महिलांमधील सिद्धदोष आणि न्यायाधीन अशा कक्षेत येणाऱ्या कैद्यांना नातेवाइकांसोबत संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांना अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे अमरावती हे राज्यातील पहिले कारागृह ठरले आहे. 

कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉलिंग सुविधेला शुक्रवारी प्रारंभ केला. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यवस्थेच्या उद्‌घाटनानंतर पहिल्यांदाच श्रीकृष्ण निवृत्ती पाचपांडे व राजाभाऊ माणिक सवणे या दोघांनी त्यांच्या मुलांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधून कुटुंबाची आस्थेने चौकशी केली. पाचपांडे याने मुलगा योगेशसोबत; तर सवणे याने गोविंद या त्याच्या मुलाशी संवाद साधला. व्यवस्था प्रारंभ झाल्यानंतर संपर्क साधणाऱ्या कैद्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच समाधानाचे भाव दिसून आले. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव या व्यवस्थेमुळे आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष भेट शक्‍य नसली, तरी उपलब्ध व्यवस्थेमुळे समाधानी असल्याचे या कैद्यांनी सांगितले. 

महिन्यातून दोन संधी 
उपलब्ध व्हिडिओ कॉलिंग सुविधेचा लाभ नियमानुसार पुरुष व महिला कैद्यांना महिन्यातून दोन वेळा घेता येईल. या व्यतिरिक्त कारागृहात कॉईनबॉक्‍सचीही सुविधा आधीपासूनच असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली.