पर्यटनातून मिळेल विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला उभारी   

पर्यटनातून मिळेल विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला उभारी   

विदर्भात मुबलक वनसंपदा आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. कोणत्याही विभागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता पर्यटन व्यवसायात आहे. ही बाब लक्षात घेऊनच राज्य शासन ‘व्हिजिट महाराष्ट्र’ हे अभियान राबवीत आहे. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासह पर्यटनस्थळांच्या ‘मार्केटिंग’वर भर देण्याची गरज आहे. तसेच गाइड प्रशिक्षणासाठी पर्यटन विकास संस्था स्थापन करण्याचे मत व्यक्त होत आहे.

पुर्व विदर्भात घनदाट जंगल आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जगप्रसिद्ध आहे. हा प्रकल्प देशातील अग्रगण्य व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. नागपूरपासून जवळच पेंच व्याघ्रप्रकल्पासह नवेगाव-नागझिरा, मेळघाट, बोर व्याघ्रप्रकल्प तर मानसिंगदेव, उमरेड-कऱ्हांडला, टिपेश्वरसारखी अभयारण्ये आहेत. या जंगलात वाघासह बिबटे, अस्वल, रानगवा रानकुत्रे आणि अन्य प्राण्यांचा अधिवास आहे. याशिवाय चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, गाविलगड, सानगडी, सीताबर्डी, नगरधन, भिवगड, बल्लारशा, अंबागड व गोंड राजाचा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांना आकर्षित करतात. विदर्भात निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणारी सृष्टी आहे. येथील वनराई मनाला भुरळ घालणारी आहे. यामुळेच पर्यटक कोकणानंतर विदर्भाला पसंती देऊ लागले आहेत. येथील व्याघ्रप्रकल्प व अभयारण्यात दररोज हजारोंनी पर्यटक दाखल होतात. यात गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यातील पर्यटकांसह मुंबई व पुणे आणि विदेशातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत पर्यटक केवळ गुजरात, मध्य प्रदेश व गोव्यातील पर्यटनालाच महत्त्व देत होते. परंतु, आता त्यात विदर्भानेही स्थान मिळविले आहे. 

पर्यटनातून रोजगाराच्या संधी 
पर्यटनातून आनंद मिळतो, शिवाय रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. या क्षेत्रात वर्ग एक-ते वर्ग चारपर्यंत रोजगाराची संधी आहे. या क्षेत्रात १० लाखांची गुंतवणूक केल्यास ८९ नवीन रोजगार निर्माण होतात. इतर उद्योगांत मात्र हे प्रमाण केवळ १३ एवढे आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखताना रोजगाराचाही विचार करणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. दुबई, मलेशिया, सिंगापूर व श्रीलंकासारख्या लहान-लहान देशांनी पर्यटनाच्या बळावर बरीच प्रगती केली आहे.


जिल्हावार दृष्टिक्षेप
अमरावती
चिखलदरा पर्यटन विकास आराखड्याला गती देण्याची गरज
पर्यटन विकासासाठी बेलोरा विमानतळावरून टेकऑफ अपेक्षित 
 पर्यटन उद्योगाला आवश्‍यक मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम हवे

भंडारा
पवनी शहरातील पुरातन मंदिर, वास्तूंकडे दुर्लक्ष 
चांदपूर, रावणवाडी, माडगी, कुंभली येथे भाविक निवासांची गरज 
अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहन, गाइडचा अभाव 
अनेक वर्षांपासून पर्यटन संकुलाचा वापर बंद. 

चंद्रपूर
माणिकगड किल्ला परिसराचा विकास व्हावा
गोंडकालीन किल्ल्यांचे संवर्धन व्हावे
विंजासन बुद्धकालीन गुहांची दुरवस्था
घोडाझरी, मुक्ताई पर्यटनस्थळांचा विकास हवा

गडचिरोली
चपराळा, भामरागड या अभयारण्यांकडे दुर्लक्ष
विदर्भाची काशी मार्कंडादेव अविकसित
माओवाद्यांच्या भीतीने पर्यटकांची पाठ
आदिवासी संस्कृती व निसर्ग स्थळांचे पर्यटकांना  आकर्षण; परंतु सोयी नाहीत
 

वर्धा
महत्त्वाचा ‘गांधी फॉर टूमारो’ हा सेवाग्राम विकास आराखडा  अधांतरी 
नागपूर-वर्धा वनक्षेत्राला जोडणारा ‘कॉरिडॉर प्लान’ केवळ चर्चेपुरताच 
 बोर व न्यू बोर व्याघ्रप्रकल्पाचा अपवाद वगळता पर्यटकांसाठी सुविधांचा अभाव 
 पवनारमध्ये प्राचीन मानवी वस्तीसाठी उत्खनन थांबले

गोंदिया
नवेगावबांध, नागझिरा अभयारण्याचा विकास हवा
कचारगड, मांडोदेवी, मालाबाई-जुंगादादा देवस्थानांना अधिक निधी मिळावा   
पर्यटनस्थळी सोयी-सुविधांचा अभाव

तज्ज्ञ म्हणतात
गेल्या काही वर्षांत विदर्भात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. देशातील पहिले खाण पर्यटन एमटीडीसीच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. नागपूर पर्यटन ही बसही सुरू झाली आहे. पर्यटकांना बुकिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून सुटीच्या दिवशीही विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
-हनुमंत हेडे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी 

जगाचा ओढा नागपूरकडे आहे. मात्र, त्याचवेळी राज्य शासनाचे येथील पर्यटनाकडे दुर्लक्ष आहे. राज्य शासन व एमटीडीसीने येथील पर्यटन स्थळांचा विकास केला, तर येथे डॉलर्सचा पाऊस पडू शकतो. ताडोबा, तोतलाडोह व मेळघाट येथे विदेशी पर्यटकांची गर्दी होऊ शकते. कार्गो आणि मिहानमुळे दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. अशा सुलभ वातावरणात विदर्भातील पर्यटन स्थळे आणि व्याघ्रप्रकल्पांचा विकास झाला, तर येथे प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यटन उद्योग हा जगात सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. त्यामुळे एकदा का परदेशी पर्यटक येथे येऊ लागल्यास हॉटेल, टॅक्‍सी, गाइड, डेली नीड्‌स यासारखे कितीतरी उद्योग पुढे येतील.
- चंद्रपाल चौकसे,  माजी सदस्य, केंद्रीय पर्यटन महामंडळ 

काही वर्षांपासून शहरी लोकांचा कृषी पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. यातून विदर्भातील कृषी पर्यटन फुलत आहे. विदर्भातील काही सधन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. शहरी लोकांना शेती, विविध वृक्ष व फळझाडांचे आकर्षण राहिले आहे. यातूनच ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना पुढे आली. मात्र, ग्रामीण भागात विजेचा प्रश्‍न गंभीर आहे. १२ तास कमी दाबाने वीज मिळते. त्यामुळे पाण्याची अडचण होत असल्याने कृषी पर्यटनावर निर्बंध येतात. त्यामुळे २४ तास वीज देणे गरजेचे आहे. कृषी पर्यटन वाढीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आदरातिथ्याचे प्रशिक्षण शासनाने द्यावे. सर्वाधिक रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. 
-हेमंत अंबासेलकर, कृषी उद्योजक 

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे आणि गावाचे वैशिष्ट्य आहे. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे आणि पर्यटन त्या ठिकाणी पोहोचावे म्हणून पायाभूत सुविधा व रस्ते चांगले करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. जगभरातील ७५ टक्के पर्यटक मुंबईत येतात. ते वेरूळ आणि अजिंठ्याला भेट देतात. औरंगाबादला मुक्काम करतात. मात्र, उल्कापातामुळे निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे फिरकत नाही. जागतिक पातळीवर आणि पर्यटनक्षेत्रात काम करणाऱ्यांकडून या पर्यटनस्थळाच्या मार्केटिंगची गरज आहे. पर्यटकांना स्थानिकांकडून उत्तम वागणूक मिळावी यासाठी शासनाने स्थानिकांना आदरातिथ्याचे प्रशिक्षण द्यावे.   
-अविनाश जोगदंड, संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन विकास संस्था

नागपूरसह विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वप्रथम पर्यटन प्रशिक्षण संस्था सुरू करावी वा एखाद्या संस्थेसोबत त्यासाठी करार करण्याची गरज आहे. या संस्थेच्या मध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. नागपूर शहराच्या सहलीचाच विचार केला, तर पर्यटकाला मार्गदर्शन करण्यासाठी गाइड नाही. आदरातिथ्याबाबत जागरुकता नाही. त्यामुळे पर्यटकांमध्ये असुरक्षितता असल्याची भावना निर्माण होते. दीक्षाभूमी, मॉइल संग्रहालय, रामन विज्ञान केंद्र, अजब बंगला आदी महत्त्वाचे पर्यटनस्थळे नागपूर शहरात आहेत. येथे गाइडची सोय नाही. अशा ठिकाणी गाइडची नेमणूक केल्यास पर्यटकही आनंदी होईल. त्यातून पर्यटन वाढण्यास मदत होईल. 
-आदित्य शेखर गुप्ता, पर्यटनतज्ज्ञ 

वनविभागाने पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटनाच्या प्रवेशासाठी लावलेल्या चाजक अटी रद्द करणे आवश्‍यक आहे. मध्य प्रदेशातील पेंचमध्ये येणारे पर्यटक आता महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी हे पाऊल उचलणे काळाची गरज आहे. वनविभागाने अनेक सुविधा येथे उभारल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढत आहे. चिखलदरा येथील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर-चिखलदरा, वर्धा-चिखलदरा अशा बसफेऱ्या सुरू कराव्या. तसेच चिखलदऱ्यांच्या आजूबाजूचे पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते दुरुस्त करावेत.
-प्रवीण चावजी, संचालक, भीमाज पॅरेडाइज 

विदर्भात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. त्या परिसरात हेरिटेज वॉक सुरू करण्यात यावा. हॉटेल आणि ट्रॅव्हल एजंट यांच्यातील दुवा म्हणून एमटीडीसीने काम केल्यास विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. यासाठी एमटीडीसी प्रशासन पुढाकार घेत नाही. त्यामुळेच एजंट आणि हॉटेलमधील दुरावा कायम राहतो. पर्यायी पर्यटन विकासाला काही प्रमाणात खीळ बसते. दोघांमध्ये समन्वय झाल्यास पर्यटनक्षेत्रातील हॉटेल व्यवसाय वाढेल आणि स्थानिकांना रोजगारही मिळण्यास मदत होईल. 
-श्रीनिवास वरंभे, संचालक, एक्‍सेल वर्ल्ड हॉलीडेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com