रेल्वे घातपात टाळण्यासाठी गावकऱ्यांचे समुपदेशन

file photo
file photo

रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांची माहिती

नागपूर: रेल्वे प्रवासादरम्यान घातपाताच्या घटना टाळण्यासाठी नक्षलग्रस्त भागात गस्त वाढविण्यासह विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी दिली.

नागपूर भेटीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात विविध ठिकाणी रुळांवर लोखंडी खांब, मोठे दगड टाकणे वा रूळ तोडण्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. दहशतवादी संघटनांकडून घातपाताच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात येत असल्याची शंका आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून रात्रगस्त वाढविण्यात आली असल्याचे सांगितले. विशेषत: वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही रुळांची पाहणी केली जाते.

नक्षल प्रभावित गोंदिया-दुर्ग सेक्‍शनवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. "हाय अलर्ट' असताना अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येते. सर्वच प्रवाशांच्या साहित्याची तपासणी शक्‍य नसली तरी अचानक तपासणी करून संशयितांमध्ये धाक निर्माण करण्यात येतो. झोनमध्ये दरदिवशी 70 तर नागपूर विभागातील 16-17 गाड्यांमध्ये "स्कॉटिंग' करण्यात येत आहे. मुलांकडून रुळांवर दगड ठेवण्याचे वा गाड्यांवर दगड भिरकावण्याच्या घटना घडत असतात. हे प्रकार थांबविण्यासाठी विद्यार्थी, सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथींबाबत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन कारवाईला वेग दिला जाईल. झोनमध्ये मंजूर पदाच्या तुलनेत 10 टक्के पदे रिक्त आहेत. पण, आहे त्या संख्येतच गुन्हेगारीला आळा घालण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतवारी, रामटेकसह 19 स्थानकांवर "सीसीटीव्ही'
स्थानकांवरील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निर्भया फंडमधून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. त्यातून इतवारी, रामटेक, चांदाफोर्ट, छिंदवाडासह 19 ठिकाणी अद्ययावत कॅमेरे लावण्यात येणार आहेत. चांदाफोर्ट आणि रामटेक स्थानक प्रथमच सीसीटीव्ही यंत्रणेने सज्ज होणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
रेल्वेने सुरू केलेल्या 182 या हेल्पलाइन क्रमांकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बरेचदा सर्व लाइन व्यस्त असतात. यामुळे लाइन वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोबतच महिला आणि मुलांसोबत कर्मचाऱ्यांनी सौजन्याने बोलावे यादृष्टीने हेल्पलाइन क्रमांकाशी संबंधित कर्मचाऱ्यांना लखनौ येथे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com