अभ्यासक्रमांच्या माहितीसाठी "व्हर्च्युअल' प्रशिक्षण

File photo
File photo

नागपूर  : पहिली, आठवी आणि दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाने (एमएससीईआरटी) पुन्हा एकदा "व्हर्च्युअल' प्रशिक्षणाचा फंडा अवलंबविला आहे. यापूर्वी हा फंडा फ्लॉप ठरला असताना पुन्हा त्यावर लाखोंची उधळपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणातून शिक्षकांना काय कळेल? हाही प्रश्‍नच आहे.
दरवर्षी अभ्यासक्रमातील बदलासाठी एमएससीईआरटी प्रशिक्षणाचे आयोजन करते. मात्र, यावर्षी बराच उशीर झाला आहे. पुस्तकांमध्ये चुका आढळून आल्याने प्राधिकरणाला प्रशिक्षण घेणे अशक्‍य झाले. प्रशिक्षणामध्ये बराच वेळ जाणार असल्याचे निदर्शनास येताच पहिली, आठवी आणि दहावीच्या शिक्षकांना "व्हर्च्युअल' पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी स्तरावर "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे सूचना देण्यात आल्यात. सध्या प्रशिक्षणासंदर्भात तज्ज्ञ शिक्षकांचे रेकॉर्डिंग संपले आहे. आता लवकरच जिल्हास्तरावरील शिक्षकांपुढेही हीच रेकॉर्ड ऐकविली जाणार आहे. सर्वसाधारण प्रशिक्षणात प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आपल्या संकल्पना व पडणाऱ्या प्रश्‍नांची उकल करून घेत होते. "व्हर्च्युअल' प्रशिक्षण एकतर्फी आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच अशा प्रकारचे "व्हर्च्युअल' प्रशिक्षण देण्याचा उपक्रम एमएससीईआरटीने राबविला होता. मात्र, त्यात आवाज न येणे, प्रश्‍नांची उकल न होणे अशा अनेक समस्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रशिक्षण राबवून एमएसीईआरटी नेमके काय साध्य करणार? असा प्रश्‍न आहे. यासाठी जिल्हास्तरावर लाखोंच्या उधळपट्टीनंतरही शिक्षकांच्या काहीच हातात लागणार नसल्यास सर्व पैसा पाण्यात जाणार असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com