‘विश्‍व रजनीगंधा’तील कविता स्त्री जाणिवेचा एल्गार - डॉ. यशवंत मनोहर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नागपूर - ‘स्त्री भावविचारांची क्रांती ऊर्जा असलेला ‘विश्‍व रजनीगंधा’ काव्यसंग्रह नैसर्गिक प्रेमविषयक स्वप्नांचे वास्तव मांडत आहे. पर्णहीन वृक्षाचे हिरवे बिऱ्हाड कुठे गेले, असा मार्मिक प्रश्‍न विचारणारी ही कविता म्हणजे स्त्री जाणिवेचा एल्गार आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. 

कवयित्री रजनी (ऊर्जा) पुंडगे यांच्या ‘विश्‍व रजनीगंधा’ कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी डॉ. यशवंत मनोहर बोलत होते. मंचावर प्रकाश दुलेवाले, भीमराव गणवीर, प्रा. हृदय चक्रधर, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. नयना धवड, रजनी पुंडगे उपस्थित होते. डॉ. मनोहर यांनी पुंडगे यांचा काव्यसंग्रह क्रांतीचा विचार पुढे नेणारी मशाल असल्याचे गौरवोद्‌गार काढले. डॉ. धवड म्हणाल्या, पुंडगे यांनी कवितेच्या माध्यमातून स्त्री शक्तीच्या विविध भावनांचे पदर उलगडून दाखविले. 

कवयित्री पुंडगे म्हणाल्या, कविता घडविताना माझ्या आईच्या अनेक आठवणी तरल भावनांना सहज आविष्काराला प्रोत्साहन देतात. यातूनच माझे पहिले वैचारिक अपत्य या संग्रहाच्या रुपाने जन्माला आले. 

यावेळी आदिम साहित्य संगीतीचे अध्यक्ष प्रकाश दुलेवाले, वैशाली धनविजय, सरिता रामटेके, नालंदा सतीश, हेमलता ढवळे, विशाखा नकाशे, अनिता भवसागर, मनीषा काथोटे, प्रमोद वाळके, डॉ. मच्छिंद्र रामटेके, भीमराव गोंडाणे, ताराचंद चव्हाण, नागेश वाहुरवाघ, प्राजक्ता खांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.