बंपर यशाचे श्रेय मुख्यमंत्री आणि पक्षाचे

राजेश चरपे
शुक्रवार, 10 मार्च 2017

■ ठळक मुद्दे
-  ईव्हीएममध्ये गडबड नाही
- जात, पैसा ठरला गौण
- पॅनेल मतदानालाच प्राधान्य
- नोटाबंदी मुद्दाच नव्हता
- स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंपर यशाचे श्रेय नागपूरच्या मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाला दिले आहे. ‘सकाळ’ने केलेल्या सर्वेक्षणात यंदाच्या निवडणुकीत जात, धर्म तसेच पैसा गौण ठरला, मतदारांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व साफ नाकारल्याचे समोर आले. तसेच भाजपच्या विजयात ईव्हीएमचा कुठलाही हात नसल्याचे तब्बल सत्तर टक्के मतदारांचे म्हणणे आहे.

नागपूर महापालिकेत १५० पैकी भाजपचे तब्बल १०८ उमेदवार निवडून आले आहेत. महापालिकेत आजवरच्या कार्यकाळात प्रथमच एका पक्षाने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या लाटेत काँग्रेसचे फक्त २९ उमेदवार निवडून आले आहेत. तर  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची वाताहत झाली.

सेनेचे दोन, राष्ट्रवादीचा एक तर मनसेचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. मागील कार्यकाळात काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक होते. फक्त बसपनेच १० जागा जिंकून आपली प्रतिष्ठा कायम राखली. निकालानंतर भाजपने ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप पराभूतांनी केला आहे. मोर्चे काढले तसेच न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’तर्फे शहरातील मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले.

मतदारांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नात ३५ टक्के नागरिकांनी मतदान करताना पक्षाला महत्त्व दिल्याचे सांगितले. ३२ टक्के नागरिकांनी उमेदवारांची पार्श्‍वभूमी बघितली तर १९ टक्‍क्‍यांनी नेतृत्वाला मतदान केले. भाजपला मते देताना ४६ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेकडून मतदान केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ टक्के प्रभावी ठरलेत. काँग्रेसला मत देण्यात सर्वांत प्रभावी घटक कोणता या प्रश्‍नावर ३० टक्के नागरिकांनी स्थानिक नेतृत्व तर २८ टक्के नागरिकांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व असल्याचे सांगितले. मतदान करताना ७५ टक्के नागरिकांनी पॅनेलने मतदान केल्याचे सांगितले. नागपूरमध्ये नोटाबंदी व पारदर्शकता हा मुद्दाच नव्हता असे सरासरी ६० टक्के मतदारांनी सांगितले.

Web Title: Vote ki baat Nagpur