बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष

BJP flag
BJP flag

बुलडाणा - जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने शह देत सर्वाधिक मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला अाहे. भाजप यावेळी जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची  दाट शक्यता वाढली अाहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २४ जागा जिंकून पहिला क्रमांक भाजपने गाठला. यानंतर काँग्रेसने १४ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले अाहे. ६० जागांसाठी झालेल्या निवडणुक निकालात या जागा जिंकल्या.  भारतीय जनता पक्षाच्या या यशात खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदार संघांनी भरघोस पाठबळ दिले. घाटाखालील तालुक्यांनी जोरदारपणे भाजपला पाठिंबा दिला अाहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव तालुक्यात सर्वच्या सर्व सात जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले अाहेत. यानंतर मोठे यश भाजप अामदार डॉ.संजय कुटे यांच्या जळगाव जामोद तालुक्यात मिळाले. तेथे चारपैकी चार जागा भाजपला मिळाल्या.  कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस सत्ता उलटण्यासाठी भाजपने यावेळी जोर लावला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बुलडाण्यात सभा घेत विजयी करण्याचे अावाहन केले होते. भाजपला खामगाव, जळगाव जामोद, चिखली, मलकापूर, शेगाव, संग्रामपूर, मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यात जागा मिळाल्या. काँग्रेसला बुलडाणा, नांदुरा, मोताळा तालुक्यात बऱ्यापैकी जागा जिंकता अाल्या. 

खासदारांना फटका
मेहकर हा शिवसेनेचा गड समजल्या जातो. खासदार प्रतापराव जाधव यांचा हा तालुका असून त्यांनी अापला मुलगा ऋषिकेश याला देऊळगाव माळी गटातून रिंगणात उतरविले होते. मात्र खासदारांची ही घराणेशाही मतदारांनी स्पष्टपणे नाकारत सुमारे १८०० पेक्षा अधिक मतांनी जाधव यांच्या मुलाचा पराभव केला. तेथे भाजप उमेदवार संजय वडतकर विजयी झाले. 

काँग्रेस, राष्ट्रवादीला झटके
जिल्हयात सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य समजले जाते. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पकड असल्याचे सांगितले जाते. या पक्षाला सिंदखेडराजा तालुक्यामध्ये तीन जागा मिळाल्या मात्र देऊळगावराजा तालुक्यात केवळ एकच जागा भेटली. तेथे मतदारांनी घडयाळाची साथ सोडली.  काँग्रेसलाही यावेळी मतदारांनी झटके दिले. जिल्हाध्यक्ष तथा अामदार राहुल बोंद्रे यांच्या चिखली तालुक्यात सात पैकी केवळ एका गटात विजय मिळवता अाला अाहे. मेहकरमध्येही काँग्रेसची पकड ढिली झाली. 

सत्तेसाठी भाजप-शिवसेना एकत्र येणार?
जिल्हा परिषदेची निवडणुक स्वबळावर लढून भाजप २४ तर शिवसेना ९ ठिकाणी विजयी झाली. या जिल्हा परिषदेत ६० जागा असून बहुमतासाठी ३१ जागांची गरज भासेल. भाजपने सत्तेचा दावा केल्यास व शिवसेनेने मदत केल्यास हा अाकडा सहज गाठता येऊ शकतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी यापुढे कुठेही युती करणार नसल्याचे प्रचारादरम्यान वारंवार सांगितल्याने अडचण अाहे. मात्र सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात किंवा भाजप इतर पर्यायाचा (राष्ट्रवादी ८ उमेदवार) विचार करून सत्ता स्थापन्यासाठी पुढे येऊ शकते अशाही चर्चा सुरु झाल्या अाहेत.  

बुलडाणा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
भाजप २४,  शिवेसना ९, राष्‍ट्रवादी काँग्रेस ०८, काँग्रेस १४,  भारिप दोन, अपक्ष १ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com