अंबाझरी ते सुभाषनगरपर्यंत ‘वॉक वे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - स्वामी विवेकानंद स्मारकामुळे अंबाझरी तलावाच्या सौंदर्यातच भर पडली नाही तर येथे पर्यटकांचीही गर्दी वाढली. आता अंबाझरी ते सुभाषनगर या दोन मेट्रो स्टेशनला जोडणारा वॉक वे महामेट्रो तयार करणार आहे. हॉलंडची राजधानी ॲम्स्टर्डमच्या धर्तीवर तयार होणाऱ्या या वॉक वेमुळे या परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. 

नागपूर - स्वामी विवेकानंद स्मारकामुळे अंबाझरी तलावाच्या सौंदर्यातच भर पडली नाही तर येथे पर्यटकांचीही गर्दी वाढली. आता अंबाझरी ते सुभाषनगर या दोन मेट्रो स्टेशनला जोडणारा वॉक वे महामेट्रो तयार करणार आहे. हॉलंडची राजधानी ॲम्स्टर्डमच्या धर्तीवर तयार होणाऱ्या या वॉक वेमुळे या परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. 

महामेट्रो रेल्वे कार्पोरेशन अत्याधुनिक मेट्रो रेल्वे स्टेशन तयार करीत आहेत. मेट्रो रेल्वे  स्टेशनला जास्तीत जास्त ‘ग्रीन’ करण्यावर भर देण्यात येत आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही भुरळ पडावी, अशा पद्धतीने रेल्वे स्टेशन तयार करण्यात येत  आहे. प्रत्येक रेल्वे स्टेशनचे वेगळे वैशिष्ट्य राहणार आहे. अंबाझरी व सुभाषनगर मेट्रो स्टेशनही इतर स्टेशनच्या तुलनेत वेगळे राहणार आहे. अंबाझरीचा गर्द हिरवा परिसर, तलाव या बाबी  लक्षात घेता या दोन स्टेशनला जोडणारा १ किमीचा वॉक वे तयार केला जाणार आहे.

  भविष्यातील नागपूर स्मार्ट सिटी होणार असल्याची जाणीव ठेवत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी हॉलंडची राजधानी ॲम्स्टर्डमच्या धर्तीवर तयार करण्याच्या अंतिम प्रस्तावालाही मंजुरी दिली. एम्स्टर्डममध्ये रेल्वे मार्गासोबतच रस्ता आणि जलमार्ग आहे.  भविष्यात अंबाझरी तलावातून सी-प्लेनचेही नियोजन आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेचे ट्रॅक, त्याखाली वॉक वे आणि सी-प्लेन असा तिहेरी संगम या परिसराचे आकर्षण वाढविणार आहे. वाक वेच्या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार असून २४ तास सुरक्षारक्षक राहतील. नागपुरात खवय्यांसाठी विविध खमंग पदार्थाची मेजवानी येथे राहील. 

सेग्मेंटचे लॉचिंग 
सुभाषनगर ते लोकमान्यनगर या मेट्रो रेल्वे मार्गावर प्रस्तावित सुभाषनगर मेट्रो रेल्वेस्थानकाजवळील पिलरवर आज पहिले सेग्मेंट बसविण्यात आले. या सेग्मेंटचे अंदाजे वजन ४० टन आहे. येथे ३ मीटर लांबीचे ९ व २ मीटर लांबीचे २ सेग्मेंट बसविण्यात येणार आहे. प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, संचालक (वित्त) शिवमाथन यांच्या मार्गदर्शनात सेग्मेंट बसविण्यात आले.