रूपेश नरबळी प्रकरणातील आरोपी निर्दोष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

वर्धा - संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित रूपेश हिरामण मुळे (वय नऊ) या चिमुकल्याच्या नरबळी प्रकरणात सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांनी काल (ता. १) सायंकाळी पावणेसातदरम्यान हा निकाल दिला.

वर्धा - संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित रूपेश हिरामण मुळे (वय नऊ) या चिमुकल्याच्या नरबळी प्रकरणात सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांनी काल (ता. १) सायंकाळी पावणेसातदरम्यान हा निकाल दिला.

रूपेश मुळे या लहानग्याचे ८ नोव्हेंबर २०१४ ला तो राहत असलेल्या वडार वस्तीतून अपहरण झाले होते. त्याच रात्री त्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला. ९ नोव्हेंबर २०१४ ला रूपेशचा मृतदेह छिन्नविच्छिन्न स्थितीत विकास विद्यालयामागील प्रांगणात आढळून आला होता. महत्त्वाचे असे की, त्याच्या शरीरातील काही अवयव कापून काढण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीने गुप्तधनाचा शोध लावण्याकरिता दिव्यशक्ती मिळण्याकरिता हे अवयव भाजून खाल्ले होते, अशी माहिती तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, यानंतर पोलिस तपासात राहिलेले कच्चे दुवे, साक्षीदारांचे ठाम न राहणे व पुरावे गोळा करण्यात पोलिसांनी केलेली ढिलाई यातून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या आठ आरोपींत मुख्य आरोपी आसिफ शहा अजीम शहा ऊर्फ मुन्ना पठाण (वय ४३) मूळ रहिवासी सावर, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ, हल्ली मुक्काम फुकटनगर, कारला रोड, वर्धा, उत्तम पोहाणे (रा. तळेगाव टालाटुले, ता. हिंगणघाट), अंकुश गिरी (रा. पाण्याच्या टाकीजवळ, बोरगाव (मेघे), वर्धा), दिलीप खानकर (रा. वॉर्ड क्रमांक ११, खटेश्‍वर मंदिराजवळ, देवळी), दिलीप भोगे (रा. ग्रामपंचायतीसमोर, बोरगाव मेघे), सुरेश धनारे (भगतसिंग चौक, रामनगर, वर्धा), सुभाष भोयर (रा. आठवडी बाजाराजवळ, देवळी), विनोद बन्सी क्षीरसागर (रा. खटेश्‍वर मंदिराजवळ, देवळी) यांचा समावेश आहे. आरोपींच्या वतीने वेगवेगळ्या वकिलांनी, तर शासनाच्या वतीने सरकारी वकील श्‍याम दुबे, तत्कालीन सरकारी वकील ॲड. अनुराधा सबाने यांनी युक्तिवाद केला होता.

तपास ठरला कमकुवत 
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांनी आपल्या निकालात तपासातील अनेक कच्च्या दुव्यांचा उल्लेख केल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात पोलिस तपासात राहिलेल्या भरपूर उणिवा व झालेले दुर्लक्ष पाहता निकालाची प्रत पोलिस महासंचालकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रूपेशच्या जखमांविषयी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले बयाणही पोलिसांकडून दुर्लक्षिले गेले. खून करण्यास वापरलेली शस्त्रे आणि जप्त करण्यात आलेली शस्त्रे यात ताळमेळ जुळत नसल्याचेही न्यायालयाच्या लक्षात आले. यासोबत पोलिसांकडून जे साक्षीदार न्यायालयात उभे करण्यात आले होते, ते सर्व आपल्या बयाणावर ठाम राहिले नाही. त्यामुळे न्यायाधीश चांदेकर यांनी सबळ पुराव्यांचा अभाव व तपासातील कच्च्या दुव्यांमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.