आम्ही भाजपची 'बी टीम' नव्हे!- श्रीहरी अणे

आम्ही भाजपची 'बी टीम' नव्हे!- श्रीहरी अणे
आम्ही भाजपची 'बी टीम' नव्हे!- श्रीहरी अणे

नागपूर - शिवसेना आणि मनसे वेगळ्या विदर्भ राज्याचे शत्रू नसून भाजप व कॉंग्रेस आहेत. आमचा लढाही भाजप आणि कॉंग्रेसविरुद्धच आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आघाडी ही भाजपची "बी टीम‘ आहे, असे कुणाला वाटण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीहरी अणे यांनी रविवारी व्यक्त केले. "कॉफी विथ सकाळ‘मध्ये विविध प्रश्‍नांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

प्र. : अणे "विदर्भाचे केजरीवाल‘ ठरतील का?
अणे :
अण्णांच्या चळवळीत असताना आंदोलनाने किंवा मेणबत्त्या पेटवून परिवर्तन होऊ शकत नाही, हे केजरीवाल यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी व्यवस्थेचा भाग होण्यासाठी निवडणूक लढवली. त्यांचा हा निर्णय मला योग्य वाटतो आणि आम्हीदेखील तेच करतोय. तसेही ज्यांना माझा केजरीवाल होईल असे वाटते, त्यांचे मी काहीच करू शकत नाही.

प्र. : मनसेप्रमाणे आपलीही "ब्ल्यू प्रिंट‘ आहे का?
अणे ः
"ब्ल्यू प्रिंट‘ हा शब्दच मला आवडत नाही. कारण ती वरून लादलेली असते. वरून आलेल्या ब्ल्यू प्रिंटमुळेच अप्पर वर्ध्याचे पाणी इंडिया बुल्सला विकले. तसेच शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात "मेट्रो रेल्वे‘ प्रकल्प आला. ब्ल्यू प्रिंटमध्ये मुंबईचे शांघाय कसे करायचे, याची योजना असते. परंतु, कुलाब्याचा रस्ता स्वच्छ करण्यासंदर्भात उल्लेख नसतो. धोरण ठरविताना खालून वर असा प्रवाह असायला हवा. त्यासाठी स्थानिक पातळीवर खर्चाचे अधिकार द्यावे लागतात. नेमके तेच झाले नाही.

प्र. : "जशास तसे उत्तर‘ कसे देणार?
अणे ः
महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार, विरोधक तुमच्याकडे प्रथम दुर्लक्ष करतात. नंतर ते हसतात, शेवटी लढतात. विदर्भाच्या विरोधकांचे आमच्याकडे दुर्लक्ष करून झाले आणि हसूनही झाले. आता ते हात-पाय तोडण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे. विदर्भाविरुद्घ आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना आक्रमक प्रत्युत्तर देऊ. विदर्भवादी दुबळे आहेत, असा संदेश जाणार नाही. मात्र, "जशास तसे उत्तर‘ म्हणजे हातपाय मोडणे नव्हे. ती आपली संस्कृती नाही. ज्यांची अक्कल त्यात चालते, तेच ही भाषा बोलतात. विदर्भाची चळवळ नुसती आंदोलनात्मक असूच शकत नाही. त्यासाठी राजकीय बळच आवश्‍यक आहे. विरोधकांना राजकीय बळातून उत्तर द्यायचे आहे.

प्र. : मूकमोर्चाने मराठ्यांची मागणी पूर्ण होईल?
अणे :
कुठलेही आंदोलन किंवा मोर्चा त्या-त्या काळापुरता आणि प्रश्‍नापुरता मर्यादित असते. मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या मूकमोर्चाचा एक निश्‍चित अंत आहे. मराठ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक ती तरतूद आपल्या संविधानात आहे. ही मागणी निकषात बसते, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटायला हवे. त्यानंतर राष्ट्रपती निर्णय घेतील.

प्र. : "विरा‘ला फंडिंग कुणाचे?
अणे :
कुठल्याही पक्षाच्या बांधण्यासाठी पैसा आवश्‍यक आहे. मात्र, विदर्भ राज्य आघाडीला (विरा) सध्या कुणाचेही "फंडिंग‘ नाही. अनेकजण माझ्याकडे आलेत, त्यांनी पक्षासाठी पैसे देण्याची तयारी दाखवली. मात्र, वाममार्गाने आलेले "फंडिंग‘ नको, अशी स्पष्ट भूमिका आहे. दारू व पैशाच्या वाटपाशिवाय निवडणुका जिंकता येऊ शकतात. ज्यांना हा बदल घडवायचा आहे; अशाच तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देणार आहे.

प्र. : विदर्भाचा मुद्दा आत्ताच का आठवला?
अणे :
विदर्भाच्या चळवळीशी माझा संबंध जुना आहे. नागपुरात वकिली सुरू असताना मी विदर्भाच्या चळवळीत सक्रिय होतो. मात्र, मुंबईला गेल्यानंतर खंड पडला. आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावरच मला विदर्भाच्या चळवळीची आठवण आली, असे म्हणण्यात तथ्य नाही.

प्र. : समविचारी पक्षांशी तडजोड करणार का?
अणे :
विदर्भाच्या आंदोलनाला नुकसान होऊ नये, यादृष्टीने विदर्भवादी संघटनांना एका व्यासपीठावर बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. एका ठिकाणी बसून तोडगा काढला जाऊ शकतो. मी, स्वत: राजकुमार तिरपुडेंशी बोललो आहे. वामनराव चटपांशीही चर्चा सुरू आहे. विदर्भवादी नेते एकमेकांचे पाय खेचत बसले म्हणूनच चळवळीने मार खाल्ला. आता तसे होणार नाही.

"हिंदी येत नाही म्हणून धसका‘
विदर्भ हिंदी भाषिकांचे राज्य होईल, ही भीती केवळ मनसे आणि शिवसेनेलाच आहे. स्वत:ला हिंदी येत नसल्याने त्यांनी हा धसका घेतला आहे. मराठी माणसाच्या नावाने दुकानदारी चालविणाऱ्यांना ही पोटदुखी होणे स्वाभाविक आहे. वास्तविकत: भारताचा मध्यभाग असल्याने इथे सर्व प्रकारच्या संस्कृतीचे मीलन दिसेलच. यामुळे विदर्भात हिंदी भाषिक नेतृत्वही पुढे येणारच आहे, त्याचा कुणालाही त्रास नाही.

वेगळ्या विदर्भात जिल्हे दुप्पट
सद्यस्थितीत राज्यात वर्धा जिल्हा सर्वांत लहान, तर त्याच्या बाजूने असलेला यवतमाळ सर्वांत मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासनिक स्तरावर महाराष्ट्र राज्य नापास आहे. असे अनेक जिल्हे विदर्भात आहेत. ज्यांची भौगोलिक रचना योग्य नाही. विदर्भ राज्य झाल्यास जिल्ह्यांची संख्या 20-25 पर्यंत वाढवावी लागेल. केरळ व हरियानापेक्षा विदर्भ राज्य मोठे असेल, राज्याच्या निर्मितीनंतर अनेक अप्रिय निर्णय घ्यावे लागतील; पण त्याला पर्याय नसेल.

नीतेश राणे बरोबरच बोलले!
विदर्भाच्या मागणीला जनतेचा पाठिंबा असेल, तर निवडणूक लढवा, असे म्हणणारे नीतेश राणे यांचे काहीच चुकले नाही. ते अगदी बरोबर बोलले. खरोखर वेगळ्या विदर्भाला सर्वसामान्यांचा पाठिंबा असेल, तर तो निवडणुकांमधून दिसायला हवा. त्यासाठीच "विरा‘ची घोषणा करण्यात आली आहे. जनतेचा पाठिंबा असल्याचे बोलून होत नाही; तो दाखवावा लागतो, असे ऍड. अणे म्हणाले.

जांबुवंतरावांचे गणित चुकले, पण...
जांबुवंतराव धोटे माझे गुरू आहेत. मी त्यांना "विदर्भाचा राजा‘ मानतो. त्यांची गणिते चुकल्यामुळे चळवळ उभी राहायला पुन्हा 30 वर्षे लागली. मात्र, त्यांनी विदर्भासोबत प्रतारणा केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही ते स्पष्ट करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com