८ नोव्हेंबरला पाळणार ‘व्हाइट मनी डे’ - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नागपूर - आठ नोव्हेंबरला देशात नोटाबंदी लागू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे काळ्या पैशाच्या विरोधातील पाऊल होते. यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत काँग्रेसतर्फे पाळल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक डे’च्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे ‘व्हाइट मनी डे’ पाळण्यात येईल, असे भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले. 

नागपूर - आठ नोव्हेंबरला देशात नोटाबंदी लागू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे काळ्या पैशाच्या विरोधातील पाऊल होते. यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत काँग्रेसतर्फे पाळल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक डे’च्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे ‘व्हाइट मनी डे’ पाळण्यात येईल, असे भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले. 

एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांनी रविभवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आठ नोव्हेंबरला राज्यभरातील जिल्हा व तालुका पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे सांकेतिक समर्थन करण्यात येईल.

मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात दादागिरी करू नये. कायदा हातात घेऊ नये. मात्र, फेरीवाल्यांनीही कुठेही बसू नये. रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांना वाहतुकीला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी. असे सांगतानाच हाकर्स झोन तयार करावे. गुंडगिरी केल्यास हॉकर्स खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. नारायण राणेंना मंत्रिपद देण्यासंदर्भातील चर्चा आहे. खोत यांचेही मंत्रिपद कायम आहे. यामुळे आगामी विस्तारीकरणात रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तशी माहिती दिल्याचे ते म्हणाले. मंत्रिपद, महामंडळात रिपाइंला स्थान मिळावे. पत्रकार परिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बनसोड, आर. एस. वानखेडे, पवन गजभिये, राजन वाघमारे, बाळासाहेब घरडे, विनोद थुल, सतीश तांबे, कांतिलाल पखिखडे, विकास गणवीर, डॉ. मनोज मेश्राम उपस्थित होते.

पाटीदार आरक्षणासाठी मध्यस्थी 
देशात आता काँग्रेसचे सरकार येणे शक्‍य नाही. यामुळे पाटीदार समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा आणि हार्दिक पटेल यांनी भाजपला मदत करावी, असा सल्ला या वेळी आठवले यांनी दिला. या विषयावर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, असे सांगताना मोदींना विरोध करून केशूभाई पटेलांचे काय झाले हा इतिहास नजरेसमोरून घालावा, असे ते म्हणाले. जीएसटी विधेयक संसदेत एकमताने पारित झाल्यानंतर आता काँग्रेसने विरोध करू नये. त्यात सुधारणा सुचव्यावात. व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.

मायावती बौद्ध होणार नाही
बौद्ध झाल्यानंतरही हिंदूंच्या मताशिवाय विजय मिळणे शक्‍य नाही, असे सांगत देशातील अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी जातिभेद नष्ट होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वारंवार बौद्ध होण्याची प्रलोभने बसपच्या मायावती यांनी देऊ नये. मुळात त्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा नाही. सात वर्षांपूर्वी त्यांनी अशीच घोषणा नागपुरात केली होती, याची आठवण आठवले यांनी करून दिली.

Web Title: white money day 8 november