‘भरोसा सेल’मध्ये ४१३ महिलांची धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर - हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला. दोनच महिन्यात भरोसा सेलमध्ये ४१३ प्रकरणे दाखल झाली. त्यात ५३ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मकपणे काम करण्याची गरज आहे. 

नागपूर - हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला. दोनच महिन्यात भरोसा सेलमध्ये ४१३ प्रकरणे दाखल झाली. त्यात ५३ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मकपणे काम करण्याची गरज आहे. 

कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला सेल सुरू केले. महिलांना एकाच छताखाली सर्वच प्रकारच्या सुविधा आणि मदत ‘भरोसा सेल’मध्ये मिळते. पोलिस स्टेशनला तक्रार न देताही भरोसा सेलमध्ये तक्रार नोंदविता येत असल्याने दोन महिन्यांत हा आकडा ४१३ गेला. भरोसा सेलमध्ये पीडित महिलेला समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाते. यातून त्यांचा वेळ, पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल. तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरू आहे. 

हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविण्यात येत असून, याला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांत आलेल्या ४१३ प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे जरीपटका, नंदनवन, यशोदानगर, प्रतापनगर भागांतील आहेत. शहरातील महिला व युवतींच्या छेडखानीचे गुन्हे पाहता दामिनी पथकाला पुन्हा ॲक्‍टिव्ह होणे गरजेचे आहे. अन्यथा भरोसा सेलवर महिलांना ‘भरोसा’ राहणार नाही.

महिलांनी आत्मनिर्भर राहावे. कारण कुठलाही प्रसंग सांगून येत नाही. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील योग्य ती माहिती घेऊन निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे काळाची गरज आहे.  
- शुभदा संखे, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

केंद्रापर्यंत येण्याची कारणे 
संयुक्त कुटुंब पद्धत नको 
संशयवृत्ती
विवाहबाह्य संबंध 
पत्नीला मारहाण

पीडित महिला, मुले यांना एकाच ठिकाणी मदत 
भरोसा सेल २४ बाय ७ सुरू 
तक्रारींचे वर्गीकरण करून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे 
महिलांना समुपदेशन करून तात्पुरत्या निवासाची व्यवस्था

भरोसा सेल हेल्पलाइन नं. 
१०९१ आणि ०७१२- २२३३६३८ 

Web Title: women in bharosa sale