"सॅनटरी' देणार महिलांना आर्थिक बळ

भाग्यशाली वानखेडे
बुधवार, 6 जुलै 2016

नागपूर - मासिक पाळीच्या दिवसातील अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग होऊन वंध्यत्व येऊ शकते. या संदर्भात ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जागृती व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटाच्या माध्यमातून इको-फ्रेण्डली सॅनटरी नॅपकिन तयार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील 85 ठिकाणी वेडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.

नागपूर - मासिक पाळीच्या दिवसातील अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग होऊन वंध्यत्व येऊ शकते. या संदर्भात ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जागृती व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटाच्या माध्यमातून इको-फ्रेण्डली सॅनटरी नॅपकिन तयार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील 85 ठिकाणी वेडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक परिस्थतीमुळे 30-40 रुपयांना मिळणारे सॅनटरी नॅपकिन खरेदी करणे परवडत नाही. महिलांमध्ये आरोग्याबाबत काही प्रमाणात उदासीनता असल्याने त्यांचे याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण भागात 19 ते 45 वयोगटातील महिलांमध्ये 82 टक्के महिला नॅपकिन वापरत नसल्याची बाब एका अहवालातून पुढे आली आहे. बाजारात मिळणारे नॅपकिन सरासरी 35 ते 40 रुपयांना मिळतात. परंतु, बचतगटाकडून तयार होणारे सॅनटरी नॅपकिन दहा रुपयांना मिळतील. यामुळे पैशाची बचत होऊन महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती करण्यास मदत होईल. हिंगणा, मौदा, नागपूर अशा तीन युनिटमधील 85 ठिकाणी सॅनटरी नॅपकिन वेंडिग मशीन लावण्यात येतील. प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, आदिवासी आश्रमशाळा, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. मशीनमध्ये 5 रुपयांचे दोन शिक्के टाकल्यास एक पॅकेट बाहेर येईल. नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनमध्ये एका मिनिटाला 40 पीस तयार होतील. नॅपकिनमधील घटक पर्यावरणपोषक असल्याने नॅपकिन जमिनीत पुरल्यास 3 महिन्यांत खत तयार होईल. विजेची बचत व्हावी, म्हणून वेडिंग मशीन बचतगटातील महिलाच चालवतील. मशीन मथुरेवरून आणण्यात येणार आहे. त्यांची किंमत 4 लाख रुपये आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये "वूई‘ नावाचे सॅनटरी नॅपकिन बाजारात उपलब्ध आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बचतगटांना मिळेल रोजगार
बचतगटातील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी सॅनटरी नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या मदतीने बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. एक युनिटमध्ये 30 महिला राहतील. त्यात उत्पादन, कच्च्या मालासंबंधी काम, मार्केटिंगची जबाबदारी प्रत्येकी दहा महिलांकडे सोपवली जाईल. ज्या भागात युनिट तेथील महिलांना प्राधान्य दिले जाणार. ग्रामीण भागातील औषधांच्या दुकानातही नॅपकिन ठेवण्यात येतील. मशीनमध्ये दहा पॅकेट आणि एका सेंटरवर दोनशे पॅकेटचा स्टॉक राहील.