महिला मद्यतस्करांचे त्रिकूट जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर - होळीच्या तोडांवर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यतस्करी सुरू असून त्यासाठी महिलांचा वापर करून घेतला जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई करीत मद्यतस्करी करणाऱ्या तीन महिलांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून दारूच्या अडीचशे बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

नागपूर - होळीच्या तोडांवर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यतस्करी सुरू असून त्यासाठी महिलांचा वापर करून घेतला जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई करीत मद्यतस्करी करणाऱ्या तीन महिलांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून दारूच्या अडीचशे बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

छाया ठाकरे (19), रमा सहारे (60) आणि पूजा बरडे (22) अशी अटकेतील महिलांची नावे असून त्या चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी त्या मद्यसाठा घेऊन जात होत्या. ठरल्याप्रमाणे मंगळवारी तिघीही नागपुरात आल्या. मद्यसाठा खरेदी करून त्या नागपूर स्थानकावर चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीची वाट बघत होत्या. याबाबत लोहमार्ग पोलिस नायक महेंद्र मानकर यांना महिती मिळाली. लागलीच त्यांनी प्रवीण भिमटे, बबन सावजी, संतोष निंबोरकर आणि योगेश घुरडे यांच्या सहकार्याने तपासणी सुरू केली. लखनऊ - चेन्नई एक्‍स्प्रेस थांबली असतानाच ही कारवाई सुरू होती.

तिन्ही महिलांच्या हालचाली संशयास्पद होत्या. यामुळे पोलिसांनी बॅगची झडती घेतली असता त्यांच्याकडे मद्यसाठा असल्याचे स्पष्ट झाले. जप्त मद्यसाठ्याची किंमत सात हजारांच्या घरात आहे. तिघींनाही अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक 2 वर कारवाई करीत अजय पाल (27) रा. बल्लारशाह, रवी हिवराळे (30) आणि चंदन रामटेके (42) दोन्ही रा. चंद्रपूर; या मद्यतस्करांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 16 हजार 256 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गुन्हा नोंदवून त्यांनाही अटक करण्यात आली.

'आझाद हिंद'मध्ये आढळला मृतदेह
आझाद हिंद एक्‍स्प्रेसमध्ये मंगळवारी मृतदेह आढळून आला. मृत सुमारे 40 वर्षे वयोगटातील आहे. या एक्‍स्प्रेसच्या अपंगांसाठी राखीव बोगीत एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती उपरेल्वेस्थानक व्यवस्थापक कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार लागलीच डॉ. सुमित सातपुते यांना पाचारण करण्यात आले. गाडी फलाटावर येताच त्यांनी तपासून मृत घोषित केले. मृताकडे आढळलेल्या कागदपत्रावरून त्याचे नाव हजिया राय असल्याचे पुढे येत असले तरी अद्याप स्पष्ट ओळख पटू शकली नाही. मृतदेह नागपूर स्थानकावर उतरवून घेण्यात आला.