कामकाजावर आज मराठा मोर्चाचे सावट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नागपूर - दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेले विरोधक आणि नागपूर नगरीत बुधवारी (ता.14) धडकणारा मराठा मोर्चा आणि याच्या जोडीला नगर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका याचे सावट विधिमंडळाच्या कामकाजावर पडणार आहे.

वादग्रस्त संभाषण करून अडचणीत आलेले मंत्री जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी विधान परिषदेचे कामकाज बंद पाडले आहे. विधानसभेतही या मागणीवरून वारंवार गोंधळ उडाला आहे. कामकाज बंद पडले आहे. यातच राज्यात लाखोंच्या संख्येने निघणारा मराठा समाजाचा मोर्चा उद्या विधानभवनावर मोर्चा थडकणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आपल्या उत्तराद्वारे विधानसभेत आश्वासित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सत्ताधारी व विरोधक आमदार मोर्चात सहभागी होऊन मराठा समाजाला बळ देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सत्ताधारी व विरोधी बाकावरील आमदार मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तराने समाधानी नाहीत. ते दबक्‍या आवाजात याबाबत बोलत असल्याचे जाणवते. याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांत उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या जिल्ह्यांतील आमदारांना याचे वेध लागले आहेत. त्यामुळे उद्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजावर याचे सावट राहणार आहे.