आश्रमशाळेत विद्यार्थिनीचे शोषण!

File photo
File photo

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचे तेथील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी बुधवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी असे काहीही घडले नसल्याचा निर्वाळा दिल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आश्रमशाळेतील एका महिला अधीक्षिकेने यासंदर्भातील तक्रार मार्च महिन्यातच मुख्याध्यापकाकडे केली होती. पण, त्यांनी काहीही चौकशी केली नाही. प्रकल्प कार्यालयाच्या पथकाने आश्रमशाळेत येऊन चौकशी केली. मात्र, त्यांनी सदर कर्मचाऱ्याला "क्‍लीन चिट' दिली. याबाबत चार मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून तांत्रिक मुद्दा उपस्थित करून चौकशी टाळण्यात आली. अपर आयुक्तांनीाही तक्रारीची दखल घेतली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय व राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग, तथा राज्यपालांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
या प्रकरणाची "सीबीआय'मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, हेमंतकुमार कांबळे, नागेश कुमरे, जगदीश मडावी आदी उपस्थित होते.

या प्रकरणाची "चाइल्डलाइन'मार्फत तक्रार प्राप्त होताच महिला सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया पंधरे यांनी संबंधित मुलीसह तिच्या आईवडिलांचे "इन कॅमेरा' बयाण नोंदविले. त्यांनी अशी घटना घडल्याचे नाकारले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला असता "घटनाच घडली नाही तर, तपासणी कशाला' असे सांगून तपासणीस नकार दिला. या प्रकरणात मुलगी, तिच्या पालकांची काही तक्रार नाही. चौकशीतही काही तथ्य आढळले नाही.
मुकुंद कुलकर्णी,
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com