पळसाच्या पानावर लिहून शेतकर्‍याने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

गेल्या आठ दिवसांपासून तो कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर पत्नीसोबत चकरा मारत होता. त्याने कर्जमाफीचा अर्ज भरून चार दिवस झाले होते. परंतु, घरासाठी व वाहनासाठी घेतलेले खासगी कंपनीचे कर्ज कसे फेडावे, या काळजीने तो त्रस्त झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी पाच एकरांपैकी अडीच एकर जमीन विकली होती. छोटे मालवाहू वाहन चालवून व शेतातून येणार्‍या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता.

यवतमाळ : जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 16) सकाळी सातदरम्यान उघडकीस आली. प्रकाश मानगावकर (वय 42) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

गावात येणार्‍या रस्त्यालगतच्या शेतात सागाच्या झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तो सकाळी साडेतीन वाजतादरम्यान घरून निघून गेला होता. आत्महत्येपूर्वी त्याने सागाच्या एका पानावर चुन्याने ’कर्जासाठी आत्महत्या’ व दुसर्‍या पानावर ’मोदी सरकार’ असे दोन वाक्ये लिहून ठेवली. त्यानंतर ती पाने त्याने झाडाला दोरीने बांधून ठेवली. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खिशात तंबाखू व चुना आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्याच्या नावाने पाच एकर शेतजमिन असून त्याच्यावर दीड लाख रुपये पीककर्ज व खासगी कंपनीचे कर्ज होते.

गेल्या आठ दिवसांपासून तो कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर पत्नीसोबत चकरा मारत होता. त्याने कर्जमाफीचा अर्ज भरून चार दिवस झाले होते. परंतु, घरासाठी व वाहनासाठी घेतलेले खासगी कंपनीचे कर्ज कसे फेडावे, या काळजीने तो त्रस्त झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी पाच एकरांपैकी अडीच एकर जमीन विकली होती. छोटे मालवाहू वाहन चालवून व शेतातून येणार्‍या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता.

चार वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्यात त्याचा पाय फॅक्चर झाला होता. त्यातून कसातरी सावरला. तर नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला. शिवाय वाढती महागाई व कर्जफेडीच्या ससेमिर्‍यामुळे तो चिंतित राहत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. त्याच्या पश्‍चात पत्नी विद्या, बारावीला शिकत असलेली मुलगी धनश्री, तिसरीत असलेला मुलगा शिवम व वृद्ध आई असा आप्तपरिवार आहे. या घटनेने टिटवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे