राणेंना काँग्रेस कळलीच नाही: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

यवतमाळ : ‘काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय एखादी व्यक्ती घेत नाही. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, महासचिव, सचिव असे पाच ते सात जण मिळून एकमताने निर्णय घेतात. दिल्लीमधून मंजुरी झाल्याशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे राणे यांना काँग्रेस कळलीच नसल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंनी केलेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना रविवारी (ता.24) येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, प्रभारी जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा आदी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले की, ‘केंद्र शासनाला तीन वर्षे झालीत. राज्य सरकारला लवकरच तीन वर्षे होणार आहेत. या तीन वर्षांत केंद्र व राज्य शासन सर्वचस्तरावर अपयशी ठरले. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, युवकांना रोजगार असे अनेक आश्‍वासन हवेत विरली. 89 लाख शेतकर्‍यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा गाजावाजा राज्य सरकारने केला. प्रत्यक्षात 58 लाख शेतकर्‍यांनीच आनलाईन अर्ज भरले आहे. त्यामुळे पाठ थोपटून घेण्यासाठी सरकार आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्य शासनाने जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी करावी, यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. त्यासाठी दीड लाख कर्जमाफीची मर्यादा वाढवून ती तीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त करावी, राज्य शासनाची शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची मानसिकताच नसल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

क्लिनचिट देण्याचा कंत्राट ‘सीएम’कडे
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही विधिमंडळात सादर केले. त्यात ज्येष्ठमंत्री प्रकाश मेहता, सुभाष देसाई, सुभाष देशमुख आदी मंत्री, तर मोपलवार, विश्‍वास पाटील असे सनदी अधिकार्‍यांचा समावेश आहे. मात्र, या सर्वांची पाठराखण केली जाते. भ्रष्टमंत्री व अधिकार्‍यांची सोयीनुसार चौकशी सुरू असून, अशांना ‘क्लिनचिट’ देण्याचा कंत्राट ‘सीएम’नी घेतल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com