लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन व्याह्यांनी केली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

केळापूर तालुका हा पांढऱ्या खाणीसाठी प्रसिद्ध असला तरी आतापर्यंत तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यंदा कापसाचे चांगले पीक होईल, असा अंदाज असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. परतीच्या पावसाने कपाशीचे बोंडे सडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

पांढरकवडा/करंजी  : तालुक्‍यातील वाठोडा येथे नात्याने व्याही असलेल्या दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवारी (ता. 19) सकाळी अकरादरम्यान विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. वासुदेव विठोबा रोंघे (वय 70) व वासुदेव कृष्णराव राऊत (वय 65, दोघेही राहणार वाठोडा) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. 

केळापूर तालुका हा पांढऱ्या खाणीसाठी प्रसिद्ध असला तरी आतापर्यंत तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यंदा कापसाचे चांगले पीक होईल, असा अंदाज असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. परतीच्या पावसाने कपाशीचे बोंडे सडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी ही परिस्थिती पाहून आता कर्ज फेडणे अशक्‍य असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा तालुक्‍यात आहे. 

वासुदेव विठोबा रोंघे यांना अंकुश (उपसरपंच), कुंडलिक व राजू असे तीन मुले असून एक मुलगी आहे. तर वासुदेव कृष्णराव राऊत यांना संतोष व पांडुरंग असे दोन मुले असून चार मुली आहे. वासुदेव रोंघे व वासुदेव राऊत हे चांगले मित्र असल्याने राऊत यांनी आपली रत्नमाला नावाची मुलगी रोंघे यांच्या राजू नावाच्या मुलाला दिली. वासुदेव रोंघे यांच्याकडे पाच एकर शेतजमीन आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व अडणी सोसायटीचे जवळपास 80 हजार रुपयांचे कर्ज होते. तर वासुदेव राऊत यांच्याकडे शेतजमीन नाही. त्यामुळे त्यांनी 1990मध्ये शासनाच्या "ई-क्‍लास'च्या जमिनीवर अतिक्रमण करून तेथून मिळणाऱ्या आपल्या मिळकतीतून कुटुंबाचा गाडा हाकलीत होते. त्यांच्यावर सावकार व खासगी कर्ज होते. वासुदेव रोंघे व वासुदेव राऊत हे दोन-चार दिवसांपासून दोघेही वेगळ्या विचारात राहत होते. गुरुवारी (ता. 19) दोघांनीही राऊत यांच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच राऊत यांची प्राणज्योत मालवली; तर रोंघे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.