अवैध सावकारांच्या घरावर सहकार विभागाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

124 बॅंक पासबुक व कागदपत्रे जप्त

124 बॅंक पासबुक व कागदपत्रे जप्त
यवतमाळ - कर्जाऊ घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड केल्यानंतरही गहाण ठेवलेले दस्तावेज परत करण्यास सावकारांनी नकार दिला. याबाबत सहकार विभागाकडे तक्रार होताच, या अवैध सावकारांच्या प्रतिष्ठानासह घरावर छापा टाकून बॅंकांची 124 पासबुक, एटीएम कार्डसह संशयास्पद दस्तवेज शुक्रवारी (ता. 4) जप्त करण्यात आले. सहकार विभागाच्या दोन पथकांनी पुसद व श्रीरामपूर येथे केलेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

रघुनाथ साहेबराव डाखोरे (रा. सेवादासनगर ता. पुसद), भीमराव हरी तांबारे (रा. फेट्रा) व नारायण महादू सावंत (रा. फेट्रा, ता. पुसद) यांनी सुभाष माधव भोरे व विजय सुभाष भोरे यांच्याकडून अनुक्रमे 50 हजार, 50 हजार व अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. डाखोरे व तांबारे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. कर्ज घेताना या तिघांचे बॅंक पासबुक, एटीएम कार्ड सावकारांनी गहाण ठेवून घेतले. या कर्जदारांनी कर्जाची रक्कम 10 टक्के व्याजासह अनुक्रमे 90 हजार, एक लाख 55 हजार व सात लाख रुपये परत केली. मात्र, सावकारांनी या तिघांचे पासबुक, एटीएम कार्ड परत देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.