...अन सावली गायब झालीना राव!

विवेक मेतकर
गुरुवार, 24 मे 2018

दुपारच्या १२.३१ च्या क्षणाला तर सावली थेट गायबच झाल्याचा अनुभव आला. ज्या 'शून्य सावली'विषयी अकोलकर आजवर केवळ ऐकून होते, ती भौगोलिक घटना आज ते प्रत्यक्षात डोळ्यांनी अनुभवत होते.

अकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू लागला आणि सूर्य अधिकाधिक डोक्यावर येऊ लागला; तसतशी आपली सावली कमी कमी होत चालल्याचा अनुभव अनेकांना यायला सुरुवात झाली. हो, असे घडत होते... आणि दुपारच्या १२.३१ च्या क्षणाला तर सावली थेट गायबच झाल्याचा अनुभव आला. ज्या 'शून्य सावली'विषयी अकोलकर आजवर केवळ ऐकून होते, ती भौगोलिक घटना आज ते प्रत्यक्षात डोळ्यांनी अनुभवत होते.

माणसाची सावली त्याची साथ कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते; परंतु दर वर्षी असे दोन दिवस असतात, की ज्या दोन दिवशी आपली सावलीच दिसत नाही. ठरावीक वेळेपुरती ती चक्क गायबच होते. गुरुवारीही असाच एक शून्य सावलीचा दिवस होता. अकोलेकरांना हा अनुभव घेता यावा, यासाठी निसर्ग अभ्यास केंद्र तर्फे गायगव येथे खास निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या वेळी अनेक अबालवृद्धांनी सावली कशी नाहीशी होत जाते, ते पाहिले. अकोल्यातील गायगवत दुर्बिणीतून या घटनेचे आणि सौरडागांचेही निरीक्षण करता आले. काही क्षणांत पुन्हा सावली पूर्ववत झाल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी निसर्ग अभ्यास केंद्र चे ३५ कार्यकर्ते येणाऱ्या प्रत्येकास ही भौगोलिक घटना समजावून सांगत होते. एका काचेवर ठेवलेल्या विविध उपकरणांच्या साह्यानेदेखील 'शून्य सावली' अनुभवता आली. या वेळी अनेक शालेय विद्यार्थी भारावून गेले होते. अनेकांनी हा अनुभव आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतला.

zero shadow day

महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर अक्षांशांवरून सूर्याचा प्रवास सहा ते २६ मे या कालावधीत होत आहे. हा सूर्याच्या उत्तरायणाचा काळ आहे. या काळात दुपारी सूर्य डोक्यावर असताना सावली काही वेळ नाहीशी होण्याची घटना पाहायला मिळणार असून, राज्यातील विविध शहरांत हा अनुभव घेता येणार असल्याचे निसर्ग अभ्यास केंद्रचे प्रभाकर दोड यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

zero shadow day

zero shadow day

zero shadow day

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Zero Shadow Day In Akola