श्रीराम पवार लिखित 'धुमाळी'' पुस्तकाचे प्रकाशन

मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार लिखित "धुमाळी' (करंट-अंडरकरंट) आणि त्यांनी संपादित केलेल्या "संवाद क्रांती' या पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 24) रोजी झाले. अध्यक्षस्थानी "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात होते. सकाळ प्रकाशनतर्फे ही दोन्ही पुस्तके प्रकाशित झाली. राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी हाउसफुल्ल गर्दी केली. मुख्य आणि मिनी ही दोन्ही सभागृहे कार्यक्रमासाठी गर्दीने तुडुंब भरून गेली. महापौर हसीना फरास या वेळी प्रमुख उपस्थित होत्या. 

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार लिखित "धुमाळी' (करंट-अंडरकरंट) आणि त्यांनी संपादित केलेल्या "संवाद क्रांती' या पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 24) रोजी झाले. अध्यक्षस्थानी "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात होते. सकाळ प्रकाशनतर्फे ही दोन्ही पुस्तके प्रकाशित झाली. राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी हाउसफुल्ल गर्दी केली. मुख्य आणि मिनी ही दोन्ही सभागृहे कार्यक्रमासाठी गर्दीने तुडुंब भरून गेली. महापौर हसीना फरास या वेळी प्रमुख उपस्थित होत्या. 

"भारतीय राजकारणाची वाटचाल - जागतिक दृष्टिकोनातून' या विषयावर जयराम रमेश यांनी 30 मिनिटांचा संवाद साधला. त्यात त्यांनी अतिशय समर्पक शब्दांत सध्याची राजकीय वाटचाल आणि लोकशाही टिकवण्यासाठी नेमके काय करायला हवे, या विषयी मंथन घडवले. ते म्हणाले, ""लोकशाही असो किंवा राजकारण, सारेच भरभरून बोलतात; पण दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सहनशक्ती संपते की काय, असे सध्याचे चित्र आहे. जगात भारत हा एकमेव विविधतेने नटलेला देश आहे. विविधतेतून एकता हेच देशाचे बलस्थान आहे. त्या विविधतेचा सन्मानच केला पाहिजे आणि प्रत्येक घटकाला समाजात बरोबरीचे स्थान मिळेल, याचा विश्‍वास दिला गेला पाहिजे. गेल्या 25 वर्षांत आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्रांती झाली हे मान्य असले तरी विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.'' भविष्यात लोकशाही संपुष्टात येण्याची लक्षणे असून राष्ट्रीय धोरण म्हणूनच आता हा विषय अजेंड्यावर घेण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. 

नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात जयराम रमेश यांच्या संवादातीलच तीन मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ""देशातील काही विद्यापीठांत विद्यार्थ्यांना भाषण करू दिले जात नाही. कारण विरोधी मते ऐकून घेण्याची सहनशक्तीच संपली आहे. मुळात दुसऱ्याचे ऐकून घेणे आणि आपली चूक झाली असेल तर ती मान्य करण्यासाठी मन मोठे असावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे समाजातील सर्व घटकांना बरोबरीचे स्थान देणारे होते आणि मी आयुष्यभर चांगला भारतीयच बनेन, ही शिकवण आपण विसरल्याचे ते लक्षण आहे.'' 

शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ""धुमाळी (करंट-अंडरकरंट) हे पुस्तक जागतिकीकरणाला 25 वर्षे पूर्ण होत असतानाच समाजासमोर आले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यातला समाजातील सर्वच घटकांचा संघर्ष, मग तो देशातील असो किंवा जगातील बदलत्या राजकारणातील विविध पदर श्रीराम पवार यांनी अगदी अभ्यासपूर्ण मांडले आहेत.'' 

मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, ""2014 च्या निवडणुकीनंतरची बदललेली सत्ता, त्यातून पुढे आलेल्या प्रतिमानिर्मिती, प्रतिमाभंजन या संकल्पना आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राजकारणाचा बदललेला पोत, त्यातील विविध अंतर्प्रवाह आणि त्याचे भविष्यात होणारे परिणाम "करंट-अंडरकरंट'मधून सर्वांसमोर आणले. बदलत्या तंत्रज्ञानावर समाजातील प्रत्येक घटकाला स्वार होता आले पाहिजे, यासाठी "संवादक्रांती' विशेषांकातील निवडक लेखांचा संग्रह सकाळ प्रकाशनाने वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही पुस्तकांना निश्‍चित मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' दरम्यान, "सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी आभार मानले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक, पत्रकारिता, क्रीडा आदी क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती.