थकल्या पावलांना पिठलं-भाकरीचा स्वाद न्याराच

(शब्दांकन - विलास काटे)
बुधवार, 28 जून 2017

सोहळ्यात आज 
सकाळी साधूबुवाचा ओढा येथे न्याहारी
धर्मपुरीत येथे सोलापूर जिल्ह्यात पालखीचा प्रवेश
धर्मपुरीत तोफांच्या सलामीने स्वागत
शिंगणापूर फाटामार्गे नातेपुते मुक्काम

भारतीबाई नागरे, जागधरी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा
फलटणपासून विडणी आणि पिंपरदच्या शेताशिवारातून निसर्गाचा आनंद घेतला. दुपारी पिंपरदला जेवणासाठी पालखी सोहळा थांबला, तेव्हा रस्त्याच्या कडेला उभे राहून पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला. दिंडीत रोज मिष्टान्न मिळतेच, पण रस्त्यावर उभे राहून जेवताना आमच्यासारख्या असंख्य वारकऱ्यांना ‘आपण कोण’ याचा विसर पडत होता. 

सोहळा मंगळवारी सकाळी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाला. पहाटे फलटणमधील विमानतळाच्या विस्तीर्ण तळावर वारकऱ्यांची लगबग निघण्याची लगबग सुरु होती. महिला डोक्‍यावर तुळस घेऊन माउलींच्या तंबूजवळ जात होत्या. झेंडेकरी हातातील झेंडे खांद्यावर उंचावत पुढे चालत होते. माउलींची पालखी निघण्याआधी दिंड्या क्रमाक्रमाने उभ्या राहू लागल्या. देवस्थानमधील मानकऱ्याने तीन वेळा कर्णा वाजविला आणि माउलींची पालखी तळावरून ग्रामस्थांनी उचलली. आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवण्यात आली. एकेक करून वीणेकऱ्यांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. राजाभाऊ चोपदार दिंड्यांची हजेरी घेत होते. सहा वाजता सोहळा फलटणहून पुढे मार्गस्थ होऊ लागला. फलटणकर दुतर्फा माउलींना निरोप देण्यासाठी उभे होते. शहर सोडून बाहेर आल्यावर कॅनॉलवर वारकरी कपडे धुण्याचा, तर कोणी अंघोळीचा आनंद घेत होते. कॅनॉलमध्ये पाणी मुबलक असल्याने काही वारकऱ्यांनी पोहण्याचा आनंद घेतला. विठूनामाच्या साथीने सकाळची वाटचाल कशी झाली कळलेच नाही. विडणीत न्याहारीला वारकरी थांबले. शेतांमध्ये बसून वारकरी चिरमुरे, भडंग, चहा, भजीचा आस्वाद घेत होते. पुढे पिंपरद येथे सोहळा जेवणासाठी थांबला. स्थानिक लोक वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरी, चटणी, थालिपीठ घेऊन आले. संपूर्ण मार्गावर दिंडीत आम्हाला रोज गोड जेवण असते. मात्र थकल्या पावलांना पिठलं-भाकरीचा स्वाद न्याराच वाटला. रस्त्यावर कडेला उभे राहून अनेक स्थानिक अन्नदाते अन्नदान करत होते. कोणताही भेदभाव न राखता सर्व जण जेवणाचा आनंद घेऊ लागले. अहंभाव कधी गळून पडला कळलेच नाही. वारीला येण्यापूर्वी ‘सोडा अहंकार मिळवा आनंद’ असे ऐकले होते. मात्र वारीच्या वाटेवर ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ अशी अवस्था झाली होती.

पिंपरदमधील दुपारचे जेवण उरकल्यावर आम्ही पुढे बरडच्या दिशेने मुक्कामासाठी निघालो. बरडमधील छोट्या अरुंद वाटेवर चालत छोट्याशा टेकडीजवळ येऊन पोचलो. सकाळी कॅनॉलमधील अंघोळ, विडणीच्या शिवारातील नाष्टा आणि रात्री मुक्कामासाठी हवेशीर पालखीतळ अशा निसर्गरम्य वातावरणात आजची वाटचाल उरकली. आता पालखीमार्गावरील निम्मी वाटचाल उरकून उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.