भजन, हरिपाठाच्या सुरातच जागली रात्र!

अमोल काकडे 
मंगळवार, 27 जून 2017

तरडगाव - श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी येथील तळावर विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. वारकऱ्यांच्या राहुट्यांमधून भजन, हरिपाठाचे सूर कानी पडत होते. अशा आनंदी वातावरणातच रात्र संपली. पहाटे चार वाजता माउलींच्या पादुकांना अभिषेक केल्यानंतर वैष्णवांचा मेळा फलटणकडे मार्गस्थ झाला.

तरडगाव - श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी येथील तळावर विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. वारकऱ्यांच्या राहुट्यांमधून भजन, हरिपाठाचे सूर कानी पडत होते. अशा आनंदी वातावरणातच रात्र संपली. पहाटे चार वाजता माउलींच्या पादुकांना अभिषेक केल्यानंतर वैष्णवांचा मेळा फलटणकडे मार्गस्थ झाला.

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे काल (ता. २५) दुपारी फलटण तालुक्‍यात आगमन झाले. चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा तरडगावात मुक्कामी आला. पालखी मार्गावर चार ठिकाणी मानाच्या पूजा झाल्या. पालखी खांद्यावर घेऊन तळावर नेण्यात आली. त्यानंतर समाज आरती झाली. रात्री साडेदहा वाजता पादुकांना अभिषेक घालण्यात आला. तळावर माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. पालखी तळावर माउलींच्या नावाचा अखंड जयजयकार करत भाविक दर्शन करताना दिसत होते. विशेषतः महिलांची संख्या जास्त होती. आरडगाव, हिंगणगाव, सासवड, डोंबाळवाडी, कुसुर, माळेवाडी, शिंदेमाळ, भुरकरवाडी, चव्हाणवाडी, साखरवाडी, रावडी, विठ्ठलवाडी या भागांतील भाविक जास्त प्रमाणात आले होते. पालखी तळावर टाकलेल्या राहुट्यांमधून भजन, हरिपाटाचे सूर कानी पडत होते. 

दरम्यान, प्रशासनाने पालखीसाठी चोख व्यवस्था केली होती. कोठेही सुरक्षितता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. ‘निर्मल वारी’अंतर्गत दहा ठिकाणी स्वच्छतागृहे ठेवली होती. यंदा पोलिस यंत्रणाही जास्त प्रमाणात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी पालखी तळांना भेट दिल्याने पोलिस बंदोबस्तात कोणतीही कुसर राहिली नाही. वीज वितरण कंपनीचे अखंड वीजपुरवठा केला.  

पहाटे विधिवत पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर वैष्णवांचा मेळा पहाटे फलटणकडे मार्गस्थ झाला...

तरडगाव ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन
प्रशासनाच्या मदतीने तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. पाणी, वीज, आरोग्य आदींच्या सुविधा देताना आटोकाट प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या सोयी- सुविधा मिळाल्याने वारकरी, भाविकांनीही समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीतर्फे पालखी सोहळा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तरडगाव ग्रामपंचायतीने केलेले नियोजन नेटके होते, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब चोपदार व राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केली.