बारामती तालुक्यात संत सोपानदेव पालखीचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

वडगाव निंबाळकर - नीरा-बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, सदोबाचीवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक परिसरात संत सोपानदेव पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिरातील मुक्कामानंतर पालखी सोमवारी (ता. २६) सकाळी माळेगाव शिवनगरच्या दिशेने मार्गस्थ झाली. टाळ मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष यामुळे पालखी मार्गावरील गावातून भक्तिमय वातावरण तयार झाले होते. 

रविवारी सकाळी परंपरेप्रमाणे सोरटेवाडी येथील केंजळेवाड्यात पादुकांच्या पूजनानंतर पालखी होळ आठफाटा येथे आली. या वेळी वायळपट्टा, कदमवस्ती, लोहारचारी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले. दुपारचा विसावा दहाफाटा येथील आनंद विद्यालयाजवळ झाला. या वेळी चोपडज, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी परिसरातील नागरिक दर्शनासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास पालखी वडगाव निंबाळकर येथील सावतामाळी मंदिरात आली. या वेळी सावतामाळी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे माजी सरपंच सुनील ढोले, जीवन बनकर, शेखर गिरमे, रोहिदास हिरवे, माणिक गायकवाड, दत्तात्रेय बनकर, शिवाजी लोणकर यांनी स्वागत केले.

रथातून पालखी सावता मंदिरात ठेवावी, अशा मागणी पालखी सोहळा प्रमुखांकडे ग्रामस्थांनी केली. पुढच्या वेळी नियोजन बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल व निर्णय होईल, असे सोहळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तासाभराच्या विश्रांतीनंतर पालखी कोऱ्हाळे बुद्रुक येथे सिद्धेश्वर मंदिरात मुक्कामासाठी पोचली. फटाक्‍यांच्या आतषबाजीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. सोमेश्वरचे संचालक सुनील भगत, सरपंच शैला भगत, उपसरपंच उमाजी खोमणे, डी. जी. माळशिकारे यांनी स्वागत केले. सर्व ठिकाणी पालखी सोहळाप्रमुख गोपाळ गोविंद गोसावी यांनी स्वागत स्वीकारले. कोऱ्हाळे बुद्रुक येथे पाचवा मुक्काम होता. सोमवारी (ता. २६) सकाळी पालखी माळेगाव शिवनगरकडे मार्गस्थ झाली.