'अंबिका' नावाच्या मराठी ब्रँडची जर्मनीला भुरळ (वारीतलं कोंदण)

सचिन शिंदे
शुक्रवार, 23 जून 2017

तुकोबाराय पालखी सोहळा

अवघ्या तेरा वर्षात त्या बचत गटाने जर्मनीला भुरळ पाडणारी मसाल्याची चव पेटंट करण्याची किमया साध्य केली आहे.

जगद्गुरू संत तुकोबारांयाचा पालखी सोहळा यवतवरून वरवंडा मार्गस्थ झाला. दुपारचा विसावा भांडगावात झाला. दौंड तालुका सधन. मार्गात अनेक टप्प्यात पालिकेचे जंगी स्वागत होते. त्या अनुभव आलाच. मात्र भांडगावात आलेल्या वेगळ्याच अनुभवाने मराठी म्हणून अभिमानाने मान ताठ झाली.

यवतहून येताना उजव्या बाजूला भांडगावात खोर रस्त्यावर एक कारखाना दिसला. तेथे मसाले तयार होत होते. अगदी वासावरून ते लक्षात आले. याच मार्गावर सुहाना व प्रवीण मसाल्याचे कारखाने आहेत. मला  माहिती होती. तेच कारखाने असावेत म्हणून कोपऱ्यावरी  चहावाल्याकडे चौकशी केली. तर त्याने चे कारखाने यवतला असल्याचे त्याने सांगितले. पलिकडे भारूडाचा आवाज सुरू होता. मला वाटले त्याला कळाले नाही. म्हणून मी परत विचारले तर तो वैतागून म्हणाला अहो तुम्ही म्हणता ते कारखाना यवतला आहे. हा अंबिका मसाल्याचा कारखाना आहे. वारकरी चहासाठी गर्दी करत होते. त्याला ग्राहक जास्त होते. तरीही तो त्यातून मला ती माहिती देत होता. अंबिका मसाला हा कसला मसाला म्हणून माझा शोध सुरू झाला.

मुळापर्यंत जायचं ठरवलं. तेथे गेलो, मालकाचे नाव काय विचारले तर अंबिका महिला बचत गट असे सांगितले. मग मात्र कमाल वाटली. बचत गट प्रमुख कोण तर नाव कळाल कमल शंकर परदेशी. वीजा चमकाव्यात अशा विचारांनी मनात गर्दी केली. नक्की काय कनेक्शन आहे. ते शोधलेच पाहिजे. म्हणून पुढे गेलो. पन्नाशीतील कमल परदेशी भेटल्या. त्यांनी सांगितलेली माहिती डोक सुन्न करणारी होती. कमल मावशीच शिक्षण विचारल तर त्या म्हणाल्या शाळेत गेले नाही. तर शिकू काय. त्याच आता जर्मनीला मसाले करायला शिकवणार हा विचारच भारावून गेला.

कमल मावशींनी अकरा मागासवर्गीय महिलांना एकत्रीत करून बचत गटाची स्थापना 2004 मध्ये केली. अवघ्या तेरा वर्षात त्या बचत गटाने जर्मनीला भुरळ पाडणारी मसाल्याची चव पेटेंट करण्याची किमया साध्य केली आहे. ते यश असे उगाच नाही मिळत हेही समजून घेतले. त्यामागे त्यांच्या अपार कष्टाची परिसीमा स्पष्ट अधोरेखीत होत होत्या. त्यासाठी कमल मावशींच्या पूर्वाश्रमीच्या जीवनावर नक्कीच प्रकाश टाकला पाहिजे. बचत गट व मसाल्याच्या व्यवसाय करण्यापूर्वी त्या शेतीवर मजुरीने कामाला जात होत्या. त्यांच्या सोबत ताही महिलाही होत्या. रोजच्या खडतर जीवनाचा प्रवास त्यांना नेहमीचा होताच. त्यात त्या अक्षीशीत असल्याने कबाड कष्टच त्यांच्या नशीबात होते. त्यांच्याबरोबरीची महिला एक दिवस रोजंदारीवर उशिरा आली. त्यावेळी कमल मावशीने उशिरा का आली विचारले. त्या महिलेने बचत गटाचे पैसे भरायचे होते. म्हणून थांबले होते.असे सांगितले. त्यावेळी मावशीने त्यांना विचारले की, बचत गट तो काय असतो. आज त्याच कमल मावशीच्या बचत गटाने मसाल्याच्या ब्रॅन्ड बाजारात आणलाय. त्यांच्या मसाल्याला खरे मार्केट मिळवून देण्याचे श्रेय येथील खासदार सुप्रिया सुळे यांना जाते. त्यांनी मतदार संघात कष्टकरी महिलांना न्याय मिळावा, यासाठी यशस्वीनी अभियान राबवले. त्यात खुटबावच्या कमल मावशी नाव सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यात कमल मावशीच्या जिद्दीने ते यश खेचून आणले. खासदार सुळे यांच्या प्रयत्नाने कमल मावशीचा मसाला बिग बझारात पोचला.

"मला गाडी बंगल्याची हौस नाही. पण माझा मसाला कंटोनरने जर्मनीत पाठवायचा आहे," असे सतत सांगत होत्या. त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्या मसाल्याच्या चवीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्याचाही किस्सा असाच आहे. शहरी भागात कमल मावशीचा मसाला बघता बघता पसंतीस उतरला. त्यात जर्मनच्या चान्सलर  यांच्या हस्ते कष्टकरी महिलांचा सत्कार झाला त्यातही  कमल मावशी आघाडीवर होत्या. त्यांचा प्रवास एकून चान्सलर यांनी त्यांच्या जर्मन रेडीओला त्यांची मुलाखत घ्यायला पाठवले. ती जर्मनीत प्रसारीत झाली. त्यावेळी तेथील कंपनीने त्यांच्या मॊाल्याची चौकशी करून आॅर्डर देण्याचे ठरवले आहे. अंबिका सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली आहे. चार मशीन, काही वाहने खरेदी केली आहेत. त्या आॅनलाईन पद्दतीने मसाल्याच्या आॅर्डर घेतात.

चाळीस महिला कारखान्यात कामास आहेत. कारखान्याला नार्बाडने 55 लाखांचे कर्ज दिले आहे. त्यांचे स्वभांडवल 15 लाख आहे. त्यांच्या मसाल्याला तूर्त तरी बिग बझार, टाटा कंपनी, हिमाचल प्रदेश येथील बाजारपेठ मिळाली आहे. भविष्यात त्यांच्या मसाल्याची चव जर्मनीत पोचणार आहे. कमल मावशी यांचे पती शंकर यांचेही जेमतेम शिक्षण झाले आहे. मात्र एका यशस्वी महिलेला साथ देणारा पुरूष अशी त्यांची ओळख रूढ झाली आहे  तेही ते मान्य करतात. मराठी माणसाने ठरवले तर काय होवू शकते. ह्याचीच प्रचीती अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेत भेट दिल्यावर होते. हेही यानिमित्ताने स्पष्ट जाणवून गेले. बचत गट असतो. अशी सुरवात करणाऱ्या कमल मावशी बचत गटांच्या आयडाॅल बनल्या आहेत. पुण्यातील अनेक नामांकीत काॅलेजचे एमबीएसह विविध मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कमल मावशीचे मॅनेजमेंजट शिकायला येतात... हेही नसे थोडके.