शेत करा रे... विठोबारायाचे। 

शेत करा रे... विठोबारायाचे। 

आपल्या देशात पूर्वापार दोन संस्कृती नांदताना दिसतात. एक "नागरी' आणि दुसरी "नांगरी'! दोन्ही संस्कृतींत जमीन- आसमानाचे अंतर आहे. नागरी संस्कृती ही विद्या, ज्ञान, कला, शास्त्र, लेखनसंबंधित; तर नांगरी संस्कृती ही श्रमाशी, काबाडकष्टाशी निगडित बहुजनांची आहे. एकाचे नाते अक्षराशी, तर दुसऱ्याचे वखराशी जुळलेले आहे. राबराब राबायचं, रक्ताचं पाणी, हाडाची काडं करायची अन्‌ जगाचा पोशिंदा म्हणून धान्योत्पादन करायचं, तेच त्याचं जगणं, तोच त्याचा जीवनधर्म! 

धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे। 
शिवाराची होत सुगी पाखरांना तोषवावे।। 

मानवासोबत सृष्टीतील पशुपक्ष्यांच्याही उदरनिर्वाहाची जबाबदारी या नांगरधाऱ्यांची, शेतकऱ्यांची, कुणब्यांची! संत तुकाराम महाराज याच कुणबी कुळातील. ते म्हणतात, 

बरे झाले देवा कुणबी केले। 
नाही तर दंभेची असतो मेलो।। 


शेती- मातीतून तरारून येणाऱ्या संपन्न सुगीएवढीच अक्षरशेतीही तुकोबारायांच्या गाथेतून रसरसून बहरलेली दिसते. शेती आणि अक्षर अन्‌ सुगी आणि कवित्व यात अद्वैत साधण्याचं पराकोटीचं प्रतिभासामर्थ्य तुकारामांच्या ठायी आहे. ते म्हणतात, 

आनंदाचे डोही आनंद तरंग। 
आनंदची अंग आनंदाचे।। 

हाच आनंद घेत घेत, ऊन- पावसात आनंदाने नाचत- गात नागरी आणि नांगरी संस्कृतीतील भाविक संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्‍वर आदी संतांच्या पालख्यांसमवेत पंढरीकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले आहेत. माउलींच्या ओव्या अन्‌ तुकोबांचे अभंग आळवीत आहेत. यामध्ये बहुतांशी वर्ग हा शेतकरी, शेतमजूर, काबाडकष्ट करणारा आहे. शेतकऱ्याचा मूलाधार म्हणजे भूमी, शेती, जमीन आहे. तुकोबांनी तिची उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशी प्रतवारी निर्देशित केली आहे. जमीन कसताना ही प्रतवारी लक्षात घ्यावी लागते. भूमीची "जातपोत' पाहूनच कोणते पीक त्यात येऊ शकते, याचा विवेकाने निर्णय घ्यावा लागतो. यासाठीच तुकोबांनी, 
 

म्हणोनी विवेके। 
काही करणे निके।। 


असा इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांचे खडतर जगणे पाहून तुकोबा आपल्या डोळ्यांतून गळणाऱ्या आसवांचीच जणू शाई करतात, त्यातूनच त्यांची अक्षरशेती फळते, फुलते. पाण्यावाचून सारी मशागत वाया जाते, स्वप्नं भंगून जातात, म्हणूनच तुकाराम सांगू लागतात, "बीजी फळाचा भरवसा।' हे खरे असले तरी प्रत्यक्षात खायला "जतन सिंचन सरिता' महत्त्वाची असते. 

संत तुकाराम हे जसे शेतकरी आहेत, तसे वारकरीही आहेत. विठ्ठलभक्तीत पुरते विरघळलेले आहेत. त्यामुळे अनेक अभंगांतून शेतीचे वर्णन आहे. प्रतिमा, प्रतीक, दृष्टांत शेतीचे असले, तरी त्याआधारे त्यांनी विठ्ठलभक्तीचा डांगोरा पिटला आहे. ज्याच्या हृदयात "विठ्ठल' ही तीन अक्षरं पुरती मुरली, भिनली आहेत, त्याच्या मनाला अपूर्व समाधान, तृप्ती प्राप्त होते. अशा रीतीने संत तुकाराम शेती अन्‌ अध्यात्म एकरूप, एकजीव करून टाकतात. एकीकडे कृषी संस्कृतीवर प्रकाश टाकणारी रचना अध्यात्मही त्याच वेळी उजळून काढते. या संदर्भातील सर्वांत महत्त्वाचा, प्रातिनिधिक ठरणारा अभंग लक्षणीय आहे.

तो म्हणजे, 
"शेत करा रे फुकाचे। नाम विठोबारायाचे। 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com