भानुदास-एकनाथ नामाचा गजर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

परंडा - भानुदास एकनाथ नामाचा गजर करीत श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता शहरातील नाथ चौकात आगमन झाले. शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत करीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 

परंडा - भानुदास एकनाथ नामाचा गजर करीत श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता शहरातील नाथ चौकात आगमन झाले. शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत करीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 

पंढरीची वारी हा अवघ्या वारकरी सांप्रदायाचा मोठा आनंद सोहळा असून, लाडक्‍या विठुरायाला भेटण्यासाठी पायी वारी करण्यात येते. येथील नाथ चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार सूजितसिंह ठाकूर, पालिका मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी पुष्पवृष्टी करीत केले. या वेळी मानकरी मोहन देशमुख, मुकुंद देशमुख, मधुकर देशमुख, नगरसेवक मकरंद जोशी, सर्फराज कुरेशी, तसेच दत्ता रणभोर, अन्वर लुकडे, महावीर तनपुरे, ॲड. संतोष सूर्यवंशी, माजी नगरसेवक मुकुल देशमुख, राहुल बनसोडे, सुरेश सद्दीवाल, रणजितसिंह पाटील, बब्बू जिनेरी, नसीर शहाबर्फीवाले, पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांची उपस्थिती होती. 

पैठणहून १६ जूनला शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्याला ४१८ वर्षांची परंपरा आहे. वसंतबुवा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू असून, पालखीप्रमुख रघुनाथबुवा नारायण पालखीवाले आहेत. योगेशबुवा पालखीवाले, ज्ञानेशबुवा, रखमाजी महाराज नवले हे सोबत आहेत. या पालखी सोहळ्याचे पालखी मार्गावरील मिडसांगवी, पारगाव घुमरे, नांगरडोह, कव्हेदंड या चार ठिकाणी रिंगणसोहळा होतो. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारकरी मोठ्या भाविकाने विठ्ठल दर्शनासाठी ओढ मनात घेऊन चालत राहतात. या पालखीसोबत पाण्याचे चार टॅंकर, दोन वैद्यकीय पथक, दोन अँबुलन्स सेवेसाठी आहेत. शहरात जय भवानी चौकात, गणेश मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी थंड पाणी, चहा, फराळाची सोय करण्यात आली होती. मनोज चिंतामणी यांनी मोठी पुष्पवृष्टी केली. कल्याणसागर समूह, हंसराज गणेश मंडळ यांनी चहा, नाश्‍त्याची सोय केली होती. ठिकठिकाणी महिलांनी, नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील मंगळवार पेठेतील, परंपरेनुसार मोहन देशमुख यांच्या वाड्यावर पालखी सोहळा मुक्कामी असतो. बुधवारी (ता.२८) सकाळी दहा वाजता मुंगशीमार्गे पंढरपूरकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे.