वारकऱ्यांमध्येच बारामतीकरांनी पाहिला विठ्ठल

मिलिंद संगई
शनिवार, 24 जून 2017

असंख्य हात आज विविध माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटत होते. हे हात सेवा करताना त्याची ना कोठे जाहिरात होती ना कोठे फ्लेक्सबाजी. मूकपणाने सेवाव्रती भावनेतून आपल्याला जमेल तितकी व जमेल त्या स्वरुपात मदत करण्याचे काम बारामतीतील हजारो हातांनी आज केले.

बारामती -....प्रत्यक्ष पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेणे शक्य नसले तरी ज्या विठुरायाच्या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत, त्या वारकऱ्यांमध्येच आज बारामतीकरांनी विठ्ठल पाहिला....त्यांच्या सेवेमध्ये मग्न होताना बारामतीकरांनी याची देहा याची डोळा विठ्ठल पाहिल्याचा अनुभव घेतला.

असंख्य हात आज विविध माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटत होते. हे हात सेवा करताना त्याची ना कोठे जाहिरात होती ना कोठे फ्लेक्सबाजी. मूकपणाने सेवाव्रती भावनेतून आपल्याला जमेल तितकी व जमेल त्या स्वरुपात मदत करण्याचे काम बारामतीतील हजारो हातांनी आज केले. कोणी चहा, कोणी नाश्ता कोणी जेवण तर कोणी पाणी....काहींनी वारक-यांचे पाय चेपून दिले, काहींनी त्यांना निवासाची सोय करुन दिली तर काहींनी त्यांच्यासाठी फळांचे वाटप केले. मदतीचे स्वरुप प्रत्येक ठिकाणी वेगळे होते, भावना मात्र पांडुरंगाप्रती असलेली भक्ती वारक-यांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची होती. 

फळे विक्रेत्यांनी आज व्यवसाय थोडासा बाजूला ठेवत वारक-यांना फळे दिली, चहा विक्रेत्यांनी चहा दिला तर काही ठिकाणी मोफत कपड्यांचे वाटप केले गेले. वारक-यांची सेवा करताना आपले स्थान, पद व हुद्दा यांचा सर्वांनाच विसर पडला आणि मनोभावे सेवाभावाने प्रत्येकाने आज आपल्या भक्तीची प्रचिती दिली. 

लहान काय आणि छोटी मुले काय....प्रत्येकाने आज वारक-यांमध्येच विठठलाचे रुप अनुभवले आणि स्वखर्चाने प्रत्येक गोष्ट विकत आणत गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले होते, अर्थात फ्लेक्स न लावता प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता वारकऱ्यांसाठी मनोभावे सेवा करणार्यांचीच संख्या अधिक असल्याचे आज जाणवले. 

येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव व त्यांच्या सहका-यांनी आज वारक-यांच्या मोफत तपासणीसाठी कक्ष केलेला होता. या मध्ये युवा डॉक्टरांनी वारक-यांची मोफत तपासणी करीत त्यांच्यावर औषधोपचार केले.