तोफांच्या सलामीने इंदापुरात तुकोबांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. 

इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. 

न्यायाधीश के. एस. सोनावणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटन सचिव धनंजय बाब्रस, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, किसन जावळे, रामदासी अजित गोसावी, उदयसिंह पाटील, मंगेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष बापूराव जामदार, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले. 

इंदापूर बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, विठ्ठल ननवरे, पांडुरंग शिंदे, पोपट पवार, प्रा. कृष्णाजी ताटे, धनंजय गानबोटे, सुनील अरगडे यांनी पालखी खांद्यावर घेऊन कदम विद्यालयात आणली. एसएनआर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी संतांचा वेश परिधान केलेली, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत होती. संजय सोरटे, सुनीलदत्त शेलार, शरद दीक्षित यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. 

रिंगणानंतर विसाव्यासाठी शहर बाजारपेठेतून श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात सोहळा आला. संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, नगराध्यक्षा शहा, मुख्याध्यापक विकास फलफले यांच्या हस्ते या ठिकाणी आरती झाली. कर्मयोगी साखर कारखान्याच्या वतीने हजारो वारकऱ्यांना चष्मेवाटप करण्यात आले. भगवानराव भरणे पतसंस्थेच्या वतीने वारकऱ्यांना मधुकर भरणे, नानासाहेब नरुटे, विठ्ठल पाटील यांच्या हस्ते केळी व चहावाटप केले. अशोक खडके, कल्याण गोफणे, नंदकुमार गुजर यांनी राजगिरा लाडू व प्रथमोपचार केले. मुस्लिम समन्वय समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इंदापूर स्क्रॅप बॅंक, युवाक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांच्या पायांचे मालिश व औषधांचे मोफत वाटप प्रशांत सिताप, धरमचंद लोढा यांनी केले. लायन्स क्‍लब, कर सल्लागार ग्रुप, छत्रपती शिवाजी, नेताजी, आईसाहेब रिक्षा संघटना, उमेश पवार मित्रमंडळ, अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हजारो वारकऱ्यांना भाकरी, आमटी, ठेचा, जिलेबी, चहा बिस्किटे वाटप करण्यात आली. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राजेंद्र वाघमोडे, सुधीर वाघमोडे यांच्या हस्ते ‘ॲग्रोवन’च्या अंकाचे वाटप करण्यात आले. बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, पोलिस निरीक्षक सजन हंकारे आदींनी प्रशासकीय सुविधांचे नियोजन केले.