शिस्त, नियमांच्या काटेकोरपणाने मन भारावले

(शब्दांकन - सचिन शिंदे)
शुक्रवार, 23 जून 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा वरवंड मुक्कामाहून उंडवडीकडे मार्गस्थ होणार 
दुपारी एकच्या सुमारास अवघड रोटी घाटातून प्रवास 
घाट चढल्यानंतर आरती होणार
पाटस ग्रामस्थांकडून भाजी-भाकरीचा नैवेद्य
सायंकाळी सोहळा उंडवडीच्या माळावर मुक्कामी विसावणार 

मीरा मेरगळ पाटस- बिरोबावाडी (जि. पुणे) 
यवतच्या पिठलं- भाकरीमुळे वाटचालीतील मोठ्या टप्प्याचा थकवा गायब झाला. सकाळी पालखी सोहळा निघाला, त्या वेळी उत्साहाचे वातावरण होते. पहाटेच स्नान करून अनेक वारकरी हरिपाठात मग्न होते. आठच्या सुमारास सोहळा मार्गस्थ झाला. वाटचालीत अभंगांमुळे वातावरणासह मनही प्रसन्न झाले. चौदा किलोमीटरचा टप्पा चालताना फारसा त्रास झाला नाही. दुपारचा विसावा भांडगावात झाला. तेथे तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन झाले. त्या वेळी उपस्थित राहता आल्याने वारीतील आनंद द्विगुणीत झाला. घरचे सारेच वारी करतात. मी यंदा प्रथमच आले आहे. येथील वातावरण प्रसन्न तर आहेच; शिस्त, नियमांच्या काटेकोरपणाने मन भारावून गेले आहे. 

माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तुकोबारायांबद्दल वाचन करते आहे. रथामागील नव्वद क्रमांकाच्या पाटण नागेश्वर प्रासादिक दिंडीत मी चालते. सोहळ्यात आल्यानंतर अनेक नियम शिकायला मिळतात. वयाचा आदर असतोच; मात्र त्याहीपेक्षा ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. लोणीहून यवतपर्यंतचा कालचा सर्वांत मोठा टप्पा होता. मात्र, यवतकरांच्या पाहुणचाराने वाटचालीचा शीण गायब झाला. सकाळी लवकर उठून आवरले. हरिपाठ वाचला. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर काही अंतरावरील भांडगावात पोचणार होतो. तितक्‍यात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, हा आनंद काही क्षणांसाठीच टिकला. कारण पाऊस काही आलाच नाही. ढगाळ वातावरणाने पावसाच्या आशा पल्लवित करण्याचे काम केले, तीच पुढच्या वाटचालीत आमची ताकद ठरली. 

सव्वादहाच्या सुमारास भांडगावात पोचलो. तेथे दुपारी एकपर्यंतचा विसावा होता. तेथे पादुकापूजनाला उपस्थित राहिले, त्यामुळे चालण्याचे बळ वाढले, याची जाणीव पालखी वरवंडकडे मार्गस्थ झाल्यावर झाली. दुपारचे जेवण भांडगावातच केले. पिठले, भात, भाकरीसह भाजीचा बेत होता. पालखी ज्या मंदिरात विसावली होती, तेथून जवळच मैदानात पंगती बसल्या होत्या. जेवणानंतर काही काळ विश्रांती झाली आणि पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये किती शिस्त आहे, नियम किती काटेकोर पाळले जातात, चुकूनही चुका होत नाहीत, या गोष्टी शिकायला मिळाल्या.