वारी म्हणजे समानतेचे तत्त्व

चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पुणे
मंगळवार, 4 जुलै 2017

पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो.

पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो.

विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरी लहान मुलाला टाळी वाजवायला शिकवतो आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला शिकवतो. हीच आपली संस्कृती आहे. लहानपणापासूनच आपल्या पिढीवर विठ्ठलाचे संस्कार होत असतात. तारुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी यांचे विचार जीवन घडवतात. गावातील मंदिरात कीर्तन, भजनाचे कार्यक्रम असतात. अशा वातावरणात संस्कार घडत असतात. सदाचाराने वागावे, दुसऱ्याकरिता काहीतरी करावे, अशी भावना रुजते. पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो. ग्रामीण जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदात मला विठ्ठल दिसतो. मी प्रथम पंढरपूरमधील बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीस होतो. त्या वेळी वर्षभर पंढरीत राहायला मिळाले. त्यानंतर सोलापूरचा निवासी उपजिल्हाधिकारी होतो. त्या पाच वर्षांत विकासाच्या कामामध्ये सहभाग घेता आला, वारकऱ्यांची सेवा करता आली. पुण्याचा जिल्हाधिकारी झाल्यानंतर पंढरपूर, आळंदी, देहू, भंडारा डोंगर यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला. कामही माझ्या काळात सुरू झाले. सध्या विभागीय आयुक्त असताना पालखी मार्गावरील तळांची पाहणी करून त्यांच्या सुधारणांचे नियोजन केले. एकूणच माझे आयुष्य विठ्ठलाच्या, वारकऱ्यांच्या सेवेतच गेले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.