सावळ्या विठुरायाची मोहिनी

जगन्नाथ महाराज पाटील, कीर्तनकार
मंगळवार, 4 जुलै 2017

जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।।

जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।।

प्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. "माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या भेटी, कीर्तन- भजन- प्रवचनाच्या योगाने ढवळून निघालेले जनमानस, हे सर्व महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारीचे सौंदर्य आहे.

पांडुरंगाची वारी ही खरेतर आध्यात्मिक विश्‍वातील दिव्य क्रांती आहे. वारकऱ्यांच्या भावविश्‍वाची पंढरपूर ही राजधानी आहे. येथला राजा "पंढरीश- परमात्मा'. पुंडलिकराय येथले संस्थापक, तर ज्ञानोबाराय संघटक, गोरोबाकाका परीक्षक. पंढरीरायाच्या प्रेमभांडाराचे खजिनदार नामदेवराय, राजप्रतिनिधी एकनाथ महाराज आणि लोकप्रतिनिधी तुकाराम महाराज. अशा या प्रेमदरबारात सार्वभौम महाराज (विठ्ठल) यांना भेटण्याचा मुहूर्त म्हणजे पंढरीची वारी.

विटेवर उभा असलेला चैतन्याचा गाभा वारीमध्ये वारकऱ्यांच्या उसळत्या उत्साहात प्रतिबिंबित होतो.

"तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे।'
सुखी संसाराचा थाट सोडून पावलांनी पंढरीची वाट धरावी, ही त्या सावळ्या विठुरायाची मोहिनीच नव्हे काय?
पंढरीसी नाही कोणा अभिमान। पाया पडे जन एकमेकां।।
कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलेला विठ्ठल पाहिला, की समस्याग्रस्ताला आधार वाटतो. अस्वस्थदेखील आश्‍वस्त होतो. कारण विठ्ठल त्यासाठी विश्‍वस्त ठरतो. भवसागराचे दुःख कमरेइतकेच आहे. ते तुम्हाला बुडवू शकत नाही. जगण्याची उमेद सोडू नका. जीवनातल्या नैराश्‍यावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची एवढी मोठी व्यवस्था जगात कुठेही नसेल.