आरोग्यमंत्र : आरोग्य हृदयाचे

हा प्रसंग आजकाल आपल्याला थोड्याफार फरकाने खूप कुटुंबामध्ये बघायला मिळत आहे.
Heart Health
Heart HealthSakal
Summary

हा प्रसंग आजकाल आपल्याला थोड्याफार फरकाने खूप कुटुंबामध्ये बघायला मिळत आहे.

किरण ४४ वर्षांचा मध्यमवयीन आयटी प्रोफेशनल कधीतरी छातीत दुखत आहे म्हणून कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडे येतो. ईसीजी, २ डी इको आणि स्ट्रेस टेस्ट केल्या जातात. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे असे सांगितले जाते. यानंतर कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला दिला जातो. किरणला यापूर्वी काहीच त्रास नाही. फक्त कामाच्या अनियमित वेळा आणि कधीतरी धूम्रपान; तसेच व्यायामाचा अभाव हे रिस्क फॅक्टर्स त्याला आहेत. त्याच्या वडिलांची बायपास शस्त्रक्रिया वयाच्या सत्तराव्या वर्षी झालेली आहे. आता त्याने काय करावे हा प्रश्न त्याला पडलेला आहे. यानंतर त्याला विविध सल्ले मिळणे चालू होतात. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, आयुर्वेद, विविध अशास्त्रीय उपचार आणि ‘गुगल डॉक्टर’ या सर्व पर्यायांमध्ये कोणाची निवड करायची हा प्रश्न त्याच्यापुढे आहे.

हा प्रसंग आजकाल आपल्याला थोड्याफार फरकाने खूप कुटुंबामध्ये बघायला मिळत आहे. हृदयविकार, स्थूलता आणि मधुमेह हे विकार हे आधुनिक जीवनशैलीमधील बदलामुळे खूप प्रमाणात वाढत आहेत. भारतामध्ये जीवनशैलीचे हे आजार संसर्गजन्य आजार यांना मागे टाकून मृत्यूचे प्रथम क्रमांकाचे कारण झाले आहेत. भारत देश हा मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून ओळखला जातो.

आपण आता जीवनशैलीचे विकार का होतात हे समजावून घेऊयात. हे सर्व विकार सध्या अतिशय तरुण वयात होत आहेत आणि आपल्या तरुण पिढीवर आणि पर्यायाने कुटुंबावर त्याचा अतिशय ताण पडत आहे. पूर्वी हेच विकार सहाव्या अथवा सातव्या दशकात होत असत, आता ते तिसऱ्या आणि चौथ्या दशकात होत आहेत.

रिस्क फॅक्टर्स -

व्यायामाचा अभाव, मानसिक आणि शारीरिक तणाव, तंबाखू सेवन व सिगारेट स्मोकिंग, जंक फूड; तसेच कुपथ्याचे खाणे, फास्ट फूड आणि मांसाहाराचा अतिरेक हे जीवनशैलीविषयक रिस्क फॅक्टर्स हृदयविकाराला हातभार लावतात. या व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, बी-१२ जीवनसत्त्वाचा अभाव, होमोसिस्टीन वाढणे आणि अनुवंशिकता इत्यादींमुळे हृदयविकाराला चालना मिळते.

हृदयविकारावरील उपचारपद्धती ३ प्रकारांच्या शास्त्रीय आणि प्रमाणित उपचारपद्धती आहेत.

स्टेंट अँजिओप्लास्टी : यामध्ये छाती ना उघडता मांडी अथवा हातामधून एक बलून आणि स्टेंटचा वापर करून कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर केले जातात. ही प्रक्रिया टाकेविरहित आहे व रुग्णाची रोगमुक्तता लवकर होते. परंतु प्रत्येक स्टेंटला एक रेस्टेनोसिस म्हणजे परत अडथळा निर्माण होण्याची ४ ते ५ टक्के शक्यता असते. शक्यतो ७५ टक्क्यांपेक्षा जास्त अडथळा असल्यास स्टेंटचे रोपण करता येते. साधारणपणे ३ पर्यंत स्टेंट बसवता येतात. खूप जास्त अडथळे असल्यास बायपास ऑपरेशन करावे लागते. स्टेंटनंतर पहिल्या महिन्यामध्ये साधारण २ टक्के रुग्णांना स्टेंटमध्ये परत रक्ताची गुठळी म्हणजे स्टेंट थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता असते. या माहितीशिवाय असा गैरसमज होण्याची शक्यता असते, की अँजिओप्लास्टी ही एक १०० टक्के यशस्वी होणारी पद्धती आहे.

बायपास ऑपरेशन : यामध्ये संपूर्ण भुलेखाली छाती उघडून, चालू हृदयाला ना थांबविता कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या पलीकडे शरीरातीलच दुसरी रक्तवाहिनी शिवली जाते या तो अडथळा ‘बायपास’ केला जातो. याला साधारणपणे ३ ते ४ तास लागतात व रुग्णाला १ आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. खूप जास्त प्रमाणात अडथळे असल्यावर हे ऑपरेशन करावे लागते. रुग्णास पूर्णपणे बरे होण्यासाठी अँजिओप्लास्टीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. ही पद्धती अँजिओप्लास्टीपेक्षा जास्त इन्व्हॅझिव्ह असते.

शास्त्रोक्त औषधोपचार : बऱ्याच वेळी अँजिओप्लास्टी आणि बायपास या पद्धती सोडून हा तिसरा पर्याय आहे आणि तो अत्यंत उपयोगी आहे, याचा आपल्याला विसर पडतो. ॲस्पिरिन अँड क्लोपीडोग्रेलसारखी रक्त पातळ करणारी औषधे आणि स्टॅटिनसारखी कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे हृदयातील अडथळे वाढण्यापासून रोखतात आणि काही अंशी कमीदेखील करतात.

या वरील शास्त्रोक्त आणि प्रमाणित पद्धतींव्यतिरिक्त चिलेशन थेरपी, ईएसमर, ईईसीपी इत्यादी काही शास्त्रीय आधार नसलेल्या व प्रायोगिक तत्त्वावरील उपचारांची शिफारस केली जाऊ शकते. मात्र, अशा पद्धती रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्यामुळे व अप्रमाणित असल्यामुळे या पद्धतींना सध्यातरी टाळावे.

(क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com