डोलणाऱ्या ज्वारीने कोकणात नवे आयाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

गुहागर -  कोकणातील अतिपावसात कणसे भरायला अडचण होत असल्याने ज्वारी, गहू ही पिके होत नाहीत. पारंपरिक भातशेती व काही ठिकाणी नाचणीचे पीक घेतले जाते; मात्र पालशेतचे आंबा बागायतदार व प्रयोगशील शेतकरी माधव सुर्वे यांनी घाटावर होणारी ज्वारी लागवड कोकणात यशस्वी करून दाखवली आहे.

गुहागर -  कोकणातील अतिपावसात कणसे भरायला अडचण होत असल्याने ज्वारी, गहू ही पिके होत नाहीत. पारंपरिक भातशेती व काही ठिकाणी नाचणीचे पीक घेतले जाते; मात्र पालशेतचे आंबा बागायतदार व प्रयोगशील शेतकरी माधव सुर्वे यांनी घाटावर होणारी ज्वारी लागवड कोकणात यशस्वी करून दाखवली आहे.

यावर्षी पावसाळ्यात चाऱ्याचे बियाणे खरेदी करण्यासाठी सुर्वे कराडला गेले, तेव्हा तेथील कृषी विक्री केंद्राच्या मालकांनी हिरव्या चाऱ्यांसाठी ज्वारीचे बियाणे घेऊन जाण्याऐवजी चांगल्या प्रतीचे बियाणे घेऊन प्रयोग करा, 
असा सल्ला दिला. उत्पन्न मिळाले नाही तरी गायींसाठी कडबा मिळेल, असा विचार करून सुर्वेंनी अजिंक्‍य सीड्‌सचे संकरित H-२९७ हे ५ किलो ज्वारीचे बियाणे खरेदी केले.

पाऊस कमी झाल्यानंतर १५ ऑगस्ट १७ ला शेताची नांगरणी करून १ फूट १० से.मी.वर ज्वारीची पेरणी केली. पेरणीचे वेळी १ ट्रॅक्‍टर ट्राली शेणखत, २० किलो सुफला १५:१५:१५ हे खत, महिन्यानंतर २५ किलो १८:४६ :०  डी.ए.पी.हे खत वापरले. केवळ चार महिन्यांत सुर्वे यांचे शिवार ज्वारीच्या कणसांनी फुलून गेले आहे. नारळी-पोफळीच्या बागेच्या पार्श्‍वभूमीवर आणि सभोवताली असलेल्या भातांच्या शेतात मध्येच डोलणारी ही ज्वारीची कणसे कोकणातील शेतीला वेगळे आयाम मिळू शकतात, याचा ढळढळीत पडताळा देतात.

माधव सुर्वे हे दुधाचा व्यवसायही करतात. त्यांच्याकडे ६ संकरित (जर्सी) गायी आहेत. दूधविक्रीबरोबरच खवा, पनीर, पेढे, लस्सी, पेप्सी आणि आईसक्रिमही बनवतात. गायींना दररोज २५ किलो आहार द्यावा लागतो. यामध्ये पशुखाद्याबरोबरच हिरवा चारा, भाताचा पेंढा आदींचा समावेश असतो. गायींना लागणारा चाऱ्याचे ते आपल्याच शेतात उत्पादन घेतात. त्यासाठी त्यांनी २० गुंठे क्षेत्रावर हायब्रीड नेपीयर, BHN-६,यशवंत, अशा गवतांची लागवड केली आहे.

कोकणातील पर्जन्यमानाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच त्यात अनियमिताही आहे. त्यामुळे ज्वारीसारखे पीक यशस्वी होताना दिसते. ज्वारीप्रमाणेच भात कापणीनंतर गव्हाचे, अन्य डाळींचे पीकदेखील होऊ शकते का याचा प्रयोग केला पाहिजे. कदाचित बदलत्या परिस्थितीत विदर्भ, मराठवाड्यात होणारी पिके आपल्याकडेही होऊ शकतात. 
- गजेंद्र पौनीकर,
कृषी विस्तार अधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Jawar in Konkan