मंडणगडात कमी मनुष्यबळात भातशेतीचा प्रयोग

सचिन माळी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मंडणगड - तालुक्‍यातील तुळशी, पाले, भिंगळोली, अडखळ, वडवली, पिंपळोली गावातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून ‘एसआरटी’ अर्थात ‘सगुणा राइस टेक्‍निक’च्या वाढत्या प्रसारातून स्पष्ट झाली आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत.

मंडणगड - तालुक्‍यातील तुळशी, पाले, भिंगळोली, अडखळ, वडवली, पिंपळोली गावातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून ‘एसआरटी’ अर्थात ‘सगुणा राइस टेक्‍निक’च्या वाढत्या प्रसारातून स्पष्ट झाली आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत. मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान दिलासा देणारे ठरले. त्यामुळेच मंडणगड तालुक्‍यात सध्या अनेक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. कमीत कमी मनुष्यबळात उत्तम उत्पन्न घेण्याच्या दिशेने भातशेतीची वाटचाल सुरू झालेली आहे.

पारंपरिक भात लागवडीमध्ये मजुरांची कमतरता, चिखलणीचा त्रास, पावसाचा लहरीपणा यामुळे कोकणात शेती सोडली जात आहे. यावर मात करीत पार्वती रक्ते व रामचंद्र पारधी यांनी सलग दुसऱ्या वर्षी ९० क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न घेतले. शशिकांत रक्ते, गणपत म्हाब्दी, दीपेश रक्ते, सखाराम माळी, दीपक महाडिक, अनिता काते या शेतकऱ्यांनी एसआरटी भातलागवड करून ६५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न घेतले. 

पारंपारिक पद्धतीमध्ये ३५ क्विंटल उत्पन्न मिळते. ‘एसआरटी’ने शेतकऱ्यांचा नांगरणी, भातरोपवाटिका निर्मिती आणि भातलावणीचा खर्च कमी केलाच, पण त्यांना पावसाळ्यानंतर दुसऱ्या पिकासाठी तयार वाफेही मिळाले. १३६ सेमी रुंदीचे व १० सेमी उंचीचे उंचीचे गादी वाफे तयार केले जातात आणि त्यात २५ बाय २५ सेमी वर सुधारित किंवा संकरित भात बियाण्यांची ठराविक अंतराने लागवड केली जाते. ही व्यवस्था शेतात कायमस्वरूपी होते. भाताचा पेंडा, गवत आणि इतर टाकाऊ पालापाचोळा टाकून या वाफ्याची डागडुजी केली जाते. काही ठिकाणी वाफ्यात गांडूळ निर्मिती आढळून आली. त्यामुळे दरवर्षी उत्पादन वाढते. काही ठिकाणी ते दुप्पट झाल्याचा अनुभव आहे. फक्त यात एकच अडचण आहे ती म्हणजे तण नियंत्रणाची. या वाफ्यांवर तण नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करणे अपेक्षित असते.

एसआरटीच्या फायद्यामुळे शेतकरी तो पर्याय स्वीकारत आहे. तालुका कृषी विभागही याच्या प्रसारात पुढे आला आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतील.
- दीपक कुटे, उपविभागीय कृषी अधिकारी- दापोली

सगुणा भात लागवड पद्धतीत कमी खर्चात अधिक उत्पादन येत असल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी सकारात्मक असून पुढील वर्षी अधिक क्षेत्र सगुणा लागवडीखाली येईल, असा विश्वास आहे.
- संदीप कांबळे, तालुका कृषी अधिकारी मंडणगड

कृषी अधिकारी रात्रीही शेताच्या बांधावर
अधिक उत्पादन देणाऱ्या या पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून पिकांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन व पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे रवींद्र पवार व राहुल देशमुख रात्रीही शेतात येत. त्यामुळे प्रेरणा मिळे, असे प्रगतिशील शेतकरी राकेश रक्ते, समीर पारधी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri news Saguna Paddy cropping experiment