दुष्काळातही शेतीतून ७२ कोटींचे उत्पन्न

दुष्काळातही शेतीतून ७२ कोटींचे उत्पन्न

जालना-  ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा आलेख चढता ठेवला आहे. पारंपरिक पीकपद्धती बदलून द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू लागवडीला चालना दिली. दुष्काळी परिस्थितीला टक्कर देत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करीत कडवंचीतील शेतकऱ्यांनी यंदाही आधीचे विक्रम मोडत शेतीतून ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. या गावाचे दरडोई उत्पन्न दोन लाखांवर गेले आहे.

गेल्या २३ वर्षांपासून लोकसहभाग, जल-मृद्संधारण आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पीकबदल, नवतंत्रज्ञानाचा वापर करीत दुष्काळी परिस्थितीवरही मात करता येते, हे कडवंची गावाने दाखवून दिले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ‘वॉटर बजेट'' मांडत लागवडी योग्य जमिनीत बाजारपेठेनुसार द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे योग्य पीकव्यवस्थापन करीत आर्थिक प्रगतीची दिशा पकडली.

भूगर्भीय सर्वेक्षण, माथा ते पायथा या सूत्रानुसार पाणलोटाची शास्त्रीय कामे, मृद्संधारणातून जलसंधारण, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात १०० टक्‍के जल-मृद्संधारणाचे उपचार, शेततळ्यातून पाणी नियोजन, पीकपद्धतीत शास्त्रीयदृष्ट्या बदल, १०० टक्‍के ठिबकचा वापर आणि एकमेकांना साथ देत शेतीला नवी दिशा दिली. सलग दुष्काळी परिस्थितीतही कडवंचीमधील अर्थकारणाचा आलेख गेल्या २३ वर्षांत कायम चढता राहिला आहे. २७ ते २९ मे २०१९ यादरम्यान खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केलेल्या कडवंचीतील कुटुंबनिहाय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

लोकसहभागातून बदलले चित्र 
गावात पाणलोटापूर्वी १,३६६ हेक्‍टर क्षेत्र वहितीखाली होते. ते आता १,५१७ हेक्‍टरवर पोचले. दुबार सिंचित क्षेत्रात ११० टक्‍के वाढ होऊन हे क्षेत्र ३९८ हेक्‍टरवरून ८९७ हेक्‍टरपर्यंत गेले आहे. पाणलोटापूर्वी २०६ विहिरी होत्या. आता गावशिवारात ३९८ विहिरी आणि ५०३ शेततळे आहेत. जलसंधारणामुळे पाणीपातळीत ५.९४ मीटरने वाढ झाली. 

पाणलोट विकासासाठी १ कोटी २० लाख खर्च झालेल्या कामाव्यतिरिक्‍त कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १२ कोटींची कामे गावशिवारात झाली. यामध्ये ४०० शेततळे, ५०० बायोगॅस संयंत्र, १५ शेडनेट, ५० पॅक हाउसचा समावेश. विहीर खोदाई, फळबाग लागवड, ट्रॅक्‍टर, शिवार रस्ते आदी कामांमध्ये शेतकऱ्यांचा सुमारे ३५.१७ कोटींची वैयक्तिक गुंतवणूक आहे.

गावाचे वॉटर बजेट 
सरासरीच्या ८५ ते ९० टक्‍के पाऊस झाल्यास - शेती, पशुपालन आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध.
सरासरीच्या ५० ते ६० टक्‍के पाऊस झाल्यास -  शेततळे भरून ठेवणे, चारापिकाची व्यवस्था, खरीप हंगामात सिंचनाची व्यवस्था, शक्य असेल तरच भाजीपाला लागवड.
सरासरीच्या २५ ते ३५ टक्‍के पाऊस झाल्यास - फक्‍त द्राक्ष बागेसाठी शेततळ्यात संरक्षित पाणी भरून ठेवले जाते. चारापिकाची लागवड.

शेती उत्पन्नाचा चढता आलेख
२०१८-१९ मध्ये द्राक्ष व डाळिंबातून उत्पन्न ६६ कोटी, भाजीपाल्यातून दीड कोटी आणि इतर पिकांमधून ४ कोटी ६० लाखांचे उत्पन्न मिळाले. या वर्षीचे कडवंचीचे एकूण शेती उत्पन्न ७२ कोटी १० लाखांवर पोचल्याचे खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पाणलोटापूर्वी १९९६ मध्ये हे शेती उत्पन्न केवळ ७७ लाख होते. दरडोई ३,२६४ रुपये उत्पन्न हे २ लाख ३ हजारांवर पोचले आहे. याशिवाय, ३२ लाखांपर्यंत निर्माण होणारा रोजगार २०१९ मध्ये आठ कोटींवर पोचला. 

कडवंची गावाने लोकसहभागातून काटेकोरपणे पाणी नियोजन केले. जमिनीचा मगदूर टिकवून ठेवत बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शास्त्रीयदृष्ट्या पीकबदल केला. सुधारित तंत्राचा अवलंब करीत शेती उत्पन्न वाढविल्याचे निष्कर्ष कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कुटुंबनिहाय सर्वेक्षणातून पुढे आले आहेत.  
- प्रा. पंडित वासरे, प्रकल्प अभियंता, कडवंची पाणलोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com