जगभरातील नवतंत्र सांगलीच्या शिवारात

अजित झळके
शनिवार, 6 जानेवारी 2018

‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन’ विश्रामबाग, नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू झाले. जिल्ह्यातील शेतीत झपाट्याने होत असलेल्या आधुनिकीकरणाचा चेहरा दर्शविणारे आणि जगभरात शेती व पशुधन विकासासाठीचे नवे तंत्र शेतकऱ्यांच्या बांधावर आणणारे हे प्रदर्शन ठरतेय. त्यातील काही लक्षवेधी आणि शेतीला गती देणारी उत्पादने हरेक शेतकऱ्यांनी पाहिलीच पाहिजेत. 

‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन’ विश्रामबाग, नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू झाले. जिल्ह्यातील शेतीत झपाट्याने होत असलेल्या आधुनिकीकरणाचा चेहरा दर्शविणारे आणि जगभरात शेती व पशुधन विकासासाठीचे नवे तंत्र शेतकऱ्यांच्या बांधावर आणणारे हे प्रदर्शन ठरतेय. त्यातील काही लक्षवेधी आणि शेतीला गती देणारी उत्पादने हरेक शेतकऱ्यांनी पाहिलीच पाहिजेत. 

गाईला पाडीच हवीय?

शेतीला समांतर व्यवसाय म्हणून पशुपालन वाढलेय. पशुधन विकासात अत्याधुनिक तंत्राचा शोध घेऊन सामान्य शेतकऱ्यांना पोहचवण्याचा प्रयत्न प्रख्यात बी. जी. चितळे डिअरीने सातत्याने केला आहे. त्यापैकी स्वप्नवत यश म्हणजे ‘सेस्केल’ ही पशुधन पैदास प्रक्रियेतील देशातील पहिला आणि जगातील दुसरा यशस्वी प्रयोग. 

गाईला पाडी, म्हैशीला रेडीच हवी, हे पशुधन अर्थकारणात महत्वाचे मानले जाते. ते या प्रयोगाने शक्‍य झालेय. चितळे समुहाकडे ‘होस्टल फ्रिजन’ जातीचे तेरा तर भारतीय उच्च दर्जाचे काही बैल आहेत. त्याचे ‘जीन्स’ स्वतंत्र करून ते साठवले आहेत. मुरा जातीचे रेडे वापरून त्यांचेही जीन्स स्वतंत्र केलेत. या जीन्सचा वापर गाय आणि म्हैशीच्या गर्भधारणेसाठी केला जातो. त्यांना हमखास पाडी आणि रेडी जन्माला येते. या पाडी व रेडीमध्ये उत्तम दर्जाचे गुण येतात. दुग्धोत्पादनात भरघोस वाढ होते. त्या लवकर प्रजननक्षम होतात. त्यांच्या गर्भधारणेसाठी याच तंत्राचा वापर केला तर पैदास होणारी नवी पिढी ही अधिक उच्च दर्जाची असते, असे डॉ. सी. एस. जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील पशुपालकांना या तंत्राचा उपयोग व्हावा म्हणून चितळे डेअरीकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. जगभरात जास्त दुध उत्पादन देणाऱ्या उत्कृष्ट प्रजातींच्या वीर्याच्या उत्पादनाचे जागतिक दर्जाचे केंद्र व वीर्य बॅंक याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे. 

पाणी कमी, चिंता नको

जिल्ह्यात दुष्काळ ही शेतीसमोरील मुख्य समस्या. पिकांना दिलेले पाणी जमिनीत अधिक काळ टिकले आणि ते पीकाला जास्तीत जास्त उपयुक्त ठरले तर...? त्यासाठी फ्रान्सने एक उत्तम उत्पादन शोधून काढले, त्याचे नाव पॉली ॲक्रील अमाईल पॉलीमर... हे ॲब्सॉर्बर ११३ देशांत वापरले जाते. ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनात ‘नेचर केअर फर्टीलायझर’ने उपलब्ध केले आहे. ते वजनाच्या पाचशेपट अधिक पाणी धरून ठेवते.

द्राक्ष, डाळींब, ऊस व अन्य पिकांसाठी पाणी ही समस्या आहे. प्रती  एकर सहा किलो ॲब्सॉर्बर वापरल्यास त्याचा फायदा होतो, असे कंपनीचे प्रतिनिधी सुजित पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हा विषारी घटक नसल्याने त्याचा कोणताही धोका होत नाही. ते खतातून टाकता येते किंवा स्वतंत्रपणे देता येते. २ ग्रॅमपासून २० ग्रॅमपर्यंत प्रती झाड वापर गरेजेचा असतो. त्यामुळे पाण्याची ५० टक्के तर खताची ३० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते, हे सिद्ध झाले आहे.’’ या उत्पादनाने सुपिकता वाढते, हवा 
खेळती राहते. 

कमी पाण्यात अधिक पीक घेता येते. ठिबक असेल तर त्या छिद्राखाली तर पाटपाणी असेल तर पिकाजवळ किमान सहा इंचापेक्षा थोडे खोल असेल, असे मिसळणे गरजेचे असते. तीन वर्षांत त्याचे विघटन होते आणि चौथ्या वर्षी ते नव्याने वापरावे लागते. सांगली जिल्ह्यातील शेतीसाठी हे वरदान ठरू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

बागांसाठी मिनी ग्रीनहाउस

द्राक्ष, डाळींब, केळी, कलिंगड या फळबागांसह ढबू, टोमॅटो, कोबी अशा भाजीपाला पिकांचा दर्जा उंचावण्यास उपयुक्त ठरणारे ‘क्रॉप ग्रो कव्हर’ जिल्ह्यात ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनातून प्रथमच शेतकऱ्यांसमोर येत आहे. द्राक्ष बागा तयार व्हायला लागल्या की त्यावर जुन्या साड्यांचे अच्छादन केले जाते. डाळींब बागाही झाकल्या जातात.  ती गरज शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करणारे उत्पादन ‘ग्रो कव्हर’ आहे. या कव्हरमधून उन्ह, वारा आवश्‍यक प्रमाणात फळांना मिळतो. बऱ्याच प्रमाणात कीडीपासून संरक्षण होते. पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी होते, असे वरिष्ठ विपनन व्यवस्थापक अनिल राजवैद्य यांनी सांगितले. 

पीक वाढीस सुयोग्य तापमान, सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त, पक्षी व किटकांपासून संरक्षण, अति थंडी व अति उष्णतेपासून संरक्षण, हंगाम नसताना उत्पादन घेण्यास मदत असे अनेक फायदे एका उत्पादनापासून होतात. केळी, द्राक्ष आणि डाळींब शेतकऱ्यांनी तर हे उत्पादन एकदा पहावेत. त्यासाठी प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli news Agrowon Agriculture Exhibition