गव्हाचे भाव तूर्तास स्थिर राहणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नवीन गहू बाजारात येण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. मिलबर प्रकारातील गव्हाच्या भावांत वाढ झाली असून, ती पुढील काळात कमी होईल असे सध्याच्या बाजारातील स्थितीवरून दिसत आहे.

पुणे : केंद्र शासनाने विक्रीस काढलेल्या गव्हाच्या निविदांमध्ये प्रतिक्विंटल 200 ते 250 रुपये इतकी झालेली वाढ, नोटाटंचाईमुळे व्यवहारांत आलेली मंदी या कारणांमुळे गव्हाच्या भावांत तूर्तास घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नवीन गहू बाजारात येऊ लागल्यानंतर भावावर परिणाम होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. 

देशांत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात या राज्यांत गव्हाचे उत्पादन चांगले होते. 2013-14 साली सुमारे 95.85 दशलक्ष टन, 2014-15 साली 86.53 दशलक्ष टन, 2015 -16 साली 93.82 दशलक्ष टन इतके गव्हाचे उत्पादन झाले. या वर्षीच्या हंगामात पेरणी चांगली झाली असून, उत्पादन अपेक्षित येईल असा अंदाज व्यक्त होत आहे. गव्हाचा हंगाम संपत आला असून, केंद्र शासन प्रतिवर्षी साधारणपणे 30 दशलक्ष टन गहू खरेदी करते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत त्यापैकी काही गव्हाचे वितरण केले जाते. काही गव्हाचे खुल्या बाजारात लिलाव केले जातात. पंधरा दिवसांपूर्वी या गव्हाचे लिलाव झाले होते. या वर्षी या लिलावात प्रतिक्विंटल गव्हाला 200 ते 250 रुपये इतका जादा भाव मिळाला. प्रामुख्याने या गव्हाला रवा, मैदा, आटा उत्पादकांकडून मागणी असते. 'मिलबर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गव्हाच्या भावांत वाढ झाल्याचा परिणाम इतर गव्हाच्या भावावर पडला. यामुळे स्थानिक घाऊक बाजारातील गव्हाच्या प्रतिक्विंटलच्या भावांत साधारणपणे 100 ते 300 रुपयांनी तेजी आली. 

गेल्या वर्षभरात गव्हाचे भाव हे स्थिर राहिले होते. हंगामाचा शेवट सुरू झाल्याने भावांत तेजी आली, असे व्यापारी सांगत आहेत. 

नोटांमुळे बाजारावर परिणाम 
''नवीन गहू बाजारात येण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. मिलबर प्रकारातील गव्हाच्या भावांत वाढ झाली असून, ती पुढील काळात कमी होईल असे सध्याच्या बाजारातील स्थितीवरून दिसत आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत फार नाही; परंतु पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. यामुळे गहू उत्पादक मिलवाल्यांनाही कच्चा माल मिळत नाही. तयार केलेल्या मालाची वाहतूक थंडावली आहे. माल वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याने आवक कमी होत आहे,'' असे व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.

Web Title: Wheat prices to be stable