गुजरातमध्ये कापूस गाठींमध्ये काळाबाजार

विनोद इंगोले
सोमवार, 23 जानेवारी 2017

"गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्रात जोरात खेडा खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रातील या कापसात तेथील हलक्‍या प्रतिचा कापूस मिसळत गाठी बांधल्या जातात. त्यानंतर त्यांची एच-6 या नावाने विक्री होते. या माध्यमातून राज्यातील बाजार समित्यांच्या सेसवरही डल्ला मारण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा कापूस व्यावसायिकांमध्ये आहे. याबाबत शासनाने भूमिका घेत कारवाईची गरज वाटते. कापूस प्रक्रिया उद्योजकही या प्रकारामुळे धास्तावलेले आहेत.'
- डॉ. एन. पी. हिराणी,
अध्यक्ष, कापूस पणन महासंघ, मुंबई

देशाअंतर्गंत कापूस प्रक्रिया उद्योजकांमध्ये वाढली अस्वस्थता

नागपूर : देशाअंतर्गंत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याच्या परिणामी कापूस गाठीत भेसळीचे प्रकारही घडत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. गुजरात राज्यात या प्रकारांमध्ये वाढीचा आरोप होत असून, कापूस असोसिएशन ऑफ इंडियादेखील याबाबत चिंताग्रस्त असल्याचे जाणकार सूत्रांनी सांगितले.

कापसापासून मिळणाऱ्या सरकी, सरकी तेल, ढेप या उपपदार्थांच्या दरात तेजी आली आहे. त्यासोबतच गुजरात आणि पंजाबमध्ये कापसावर कीडरोगामुळे उत्पादकतेत घट झाली. यातच बांगलादेश, पाकिस्तानमध्ये भारतीय कापसाला मागणी वाढली आणि देशाअंतर्गंत प्रक्रिया उद्योजकांकडून कापूस मागणीत वाढ झाली आहे. हे सारे घटक एकत्र आल्याने कापसाचे दर वधारले आहेत.

20 जानेवारीस राज्यात 5700 रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत कापसाचे दर पोचले होते. परभणी येथे खासगी व्यापाऱ्यांकडून 5750 रुपयांचा उच्चांकी दर देण्यात आला. राज्यात आजवर 95 लाख 83 हजार 522 क्‍विंटल कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे. याउलट सीसीआय आणि पणन महासंघाकडे एकही क्‍विंटल कापसाची खरेदी होऊ शकली नाही. राज्यात कापूस क्षेत्रात अशाप्रकारे तेजीचे वारे वाहत असताना याचा फायदा उचलण्यासाठी गुजरातेतील व्यापारी सरसावले आहेत. गुजरातमधील काही खासगी व्यापाऱ्यांनी काळ्याबाजाराला प्रोत्साहन देत भेसळयुक्‍त गाठींच्या विक्रीचे काम चालविल्याची चर्चा कापूस क्षेत्रात व्यावसायिक स्तरावर काम करणाऱ्या जाणकारांमध्ये आहे.

एच-6 नावाने गाठींची विक्री
या वर्षी महाराष्ट्राची कापूस उत्पादकता चांगली आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापारी आपल्या एजंटमार्फत गावात जाऊन खेडा खरेदी करत आहेत. महाराष्ट्रातील चांगल्या प्रतिचा कापूस आणि त्यात गुजरातमध्ये उत्पादित हलक्‍या प्रतिच्या कापसाची भेसळ करत गाठी बांधल्या जातात. त्यावर मग "एच-6' असे लेबल लावत कापूस गाठींची विक्री होत आहे. हायब्रीड-6 या कापसापासून उत्पादित गाठींना मागणी अधिक राहते. त्यांचा दर्जा चांगला असतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे गुजरातमधील व्यापारी अशाप्रकारचा काळाबाजार करत नफा मिळविण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Web Title: black market of gujarat cotton