नाशिकच्या पोल्ट्रीला २०० कोटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक - मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा परिणाम जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २०० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कंपनी, तसेच शेतकऱ्यांकडे ७० टक्के माल पडून असल्याने त्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. 

नाशिक - मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा परिणाम जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २०० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कंपनी, तसेच शेतकऱ्यांकडे ७० टक्के माल पडून असल्याने त्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय मुंबई, गुजरातवर अवलंबून आहे. परंतु दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे कोंबड्यांची वाहतूक बंद आहे. कंपनी, तसेच शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ७० टक्के माल पडून आहे. दिवसाला कोंबड्या भरून जाणाऱ्या सुमारे १०० वाहनांपैकी केवळ २० ते ३० वाहनांची कशीबशी वाहतूक होत आहे. केवळ ३० टक्के माल विक्री होत असल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. 

किरकोळ व्यापारावरही परिणाम
मुंबई, गुजरातकडे कोंबड्यांची वाहतूक होत नाही. जिल्ह्यातील बऱ्याच पोल्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर माल पडून आहे. साइज वाढल्यावर मागणी होत नसल्याने कंपनीचालक, तसेच शेतकरी किरकोळ व्यापारातून आपले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. लहान व्यापाऱ्यांच्या मार्फत शहरासह जिल्ह्यातील चिकन आणि हॉटेल व्यावसायिकांना कमी दरात माल विक्री करत आहेत. त्यातून लहान व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उन्हाळ्यात १०० ते ११० रुपयांत विक्री होणारी जिवंत कोंबडी सद्या ५८ रुपयांस विक्री होत आहे. १५० ते २०० रुपये किलो विक्री होणारे चिकन १०० ते १२० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. 

मुंबईतील पावसामुळे मालाचे दर पूर्णतः कोलमडले आहे. जागोजागी पाणी साचल्याने मालाची वाहतूक होत नाही. ७० टक्के माल पडून असल्याने दैनंदिन ५० कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. काही दिवस आणखी अशी परिस्थिती राहिल्यास पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे धोक्‍यात सापडण्याची शक्‍यता आहे.   - बापूसाहेब ताजणे, शेतकरी, निफाड 

चिकन, हॉटेल व्यावसायिक कमी दरात मालाची मागणी करत आहेत. शिवाय मालाची साइज मोठी असली तरी व्यावसायिकांकडून मालाची खरेदी केली जात नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होत आहे.
- एजाज शेख, किरकोळ व्यापारी

Web Title: 200 crores of loss to poultry in Nashik