"कांदा उत्पादनात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आवश्‍यक'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नाशिक : कांदा पीक घेताना शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब टाळून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणाचा वापर करावा, असे आवाहन मालेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ महेंद्र पवार यांनी केले.

नाशिक : कांदा पीक घेताना शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब टाळून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणाचा वापर करावा, असे आवाहन मालेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ महेंद्र पवार यांनी केले.

"ऍग्रोवन' आणि दीपक फर्टिलायझर्स यांच्या वतीने "दर्जेदार कांदा उत्पादन तंत्र व खत व्यवस्थापन' या विषयावर भौरी (ता. नांदगाव) येथील हनुमान मंदिर सभागृह चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्तू माणिकराव भिलोरे होते. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब विठ्ठलराव हिरे, कृषी सहायक सौ. एस. व्ही. जाधव, कृषी उद्योजक मनोज चोपडा, निवृत्ती पाटील, चांगदेव भिलारे, तुकाराम गायकवाड, रामा हिरे, मधुकर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणाचा वापर करावा. लागवडीच्या वेळी दोन ओळीतील अंतर 45 सेंटिमीटर असावे. यामुळे कांदा एकसारख्या प्रतीचा येतो व उत्पादनात वाढ होते. कांद्याचे रोप तयार करण्यासाठी गादी वाफ्याचा वापर करावा. बियाणे पेरणीपूर्वी ट्रायकोडर्माचा वापर करावा. कांदा पीक घेताना शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन करावे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत नाही. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पवार यांनी उत्तरे दिली. सौ. जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. स्वप्नील घोरपडे यांनी दीपक फर्टिीलायझर्सच्या उत्पादनाविषयी माहिती दिली. "ऍग्रोवन'चे प्रतिनिधी सुनील रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले.