33 शेतकऱ्यांनी गटशेतीतून पिकवली भेंडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बीड - पिकले ते विकणार नाही, विकले तर भाव मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करीत भेंडीचे उत्पादन घेतले. सावरगाव (ता. गेवराई) येथील शेतकऱ्यांनी गटशेतीतून पिकवलेली भेंडी आता विमानाने युरोपात जात आहे. गटशेतीचे हे दुसरे वर्ष आहे. 

बीड - पिकले ते विकणार नाही, विकले तर भाव मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करीत भेंडीचे उत्पादन घेतले. सावरगाव (ता. गेवराई) येथील शेतकऱ्यांनी गटशेतीतून पिकवलेली भेंडी आता विमानाने युरोपात जात आहे. गटशेतीचे हे दुसरे वर्ष आहे. 

दुष्काळ हा जिल्ह्याच्या पाचवीला पूजलेला आहे. त्यातच पिकलेल्या उत्पादनाला भाव मिळत नाही; पण नेहमी रडत, दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा प्रचलित पद्धतीपेक्षा गटशेतीचा नवा मार्ग सावरगाव (ता. गेवराई) येथील शेतकऱ्यांनी शोधला. गेल्या वर्षी 18 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीच्या माध्यमातून भेंडीची लागवड केली. कृषी विभागाच्या व्हेज नेट प्रकल्पाअंतर्गत उत्पादित भेंडी खुशी इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून परदेशात विकली. मागच्या वर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा राजाभाऊ जाधवर, शेषेराव जाधवर, संदीप जाधवर, अशोक जाधवर, बंडू जाधवर आदी 33 शेतकऱ्यांनी एकत्र येत भेंडीचे पीक घेतले. कंपनीचे वाहन दररोज संध्याकाळी भेंडी घेऊन जाते. दररोज साधारण एक टन याप्रमाणे आतापर्यंत 35 टन भेंडीची निर्यात झाली असून आणखी एवढेच उत्पादन अपेक्षित आहे. 

दलालविरहित विक्री 
शेती उत्पादनाची दलालविरहित विक्री हा व्हेज नेट प्रकल्पाचा उद्देश आहे. बाजारात 15 ते 20 रुपये किलो दर असलेल्या भेंडीला कंपनी 24 रुपये किलोचा हमी भाव देते. कंपनीचे वाहन शेतकऱ्यांच्या शेतात येऊन उत्पादन घेऊन जात असल्याने वाहतूक खर्चही नाही. तसेच बियाणे, फवारणीची औषधेही कंपनीच पुरवते. ऑस्ट्रेलिया, जपान, बेल्जेयिम, इंग्लंड, कॅनडा, स्वित्झर्लंड व दुबईला भेंडीची निर्यात झाली आहे. शेतकऱ्यांना साधारण 27 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दररोज साधारण दीड ते दोन हजार रुपये मिळतात. या गटशेतीची नुकतीच राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रंबंधक संस्थानचे सहायक निदेशक जी. के. बनकल यांनी पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक केले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी संतोष घसिंग, कृषी सहायक चंद्रकांत कुसळकर सोबत होते. 

Web Title: 33 farmers cultivated Lady's finger