मेंढीपालन व्यवसाय प्रोत्साहनासाठी  ४६ कोटींची नवी योजना राबविणार

प्रतिनिधी
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - मेंढीपालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत ६ मुख्य घटकांसह ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी (ता.२२) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई - मेंढीपालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत ६ मुख्य घटकांसह ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी (ता.२२) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करण्यासंदर्भात नवीन योजना सुरू करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. त्यानुसार ६ मुख्य घटकांसह नवीन योजनेस मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित ३४ ग्रामीण जिल्ह्यांतील भटक्‍या जमातीला (भज-क) या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेच्या घटकांमध्ये २० मेंढ्या व १ मेंढा या प्रमाणात पायाभूत सुविधेसह एक हजार मेंढीगट वाटप करणे, तसेच या योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व स्वत:च्या मेंढ्या असणाऱ्या मेंढपाळास सुधारित प्रजातीचे ५३४० नर मेंढे वाटप करणे, स्वत:च्या मेंढ्या असणाऱ्या एक हजार मेंढपाळांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान, सुमारे १३ लाख मेंढ्यांसाठी संतुलित खाद्य पुरविण्यासाठी अनुदान, कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचे मूरघास बनविण्यासाठी गासड्या बांधण्याची २५ यंत्रे खरेदी करण्यास प्रोत्साहन आणि राज्यात पाच ठिकाणी पशुखाद्य कारखाने निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान यांचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत पायाभूत सोयी-सुविधेसह मेंढीगट वाटप, सुधारित जातीचे नर मेंढे वाटप तसेच मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधा व मेंढ्यांसाठी पशुखाद्य पुरविण्यासाठी ७५ टक्के अनुदान मिळणार असून २५ टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा राहणार आहे. त्याचप्रमाणे कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनविण्यासाठी गासड्या बांधण्याचे २५ यंत्र (Mini Silage Baler cum Wrapper) खरेदीसाठी (चार लाख मर्यादेपर्यंत) आणि मेंढ्यांसाठी पशुखाद्य तयार करणारे कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान (पाच लाख मर्यादेपर्यंत) मिळणार आहे. योजनेनुसार २० मेंढ्या व १ मेंढा (स्थायी-५०० व स्थलांतरित-५००) असे एकूण एक हजार मेंढीगटाचे वाटप करण्यात येणार असून पुढील १० वर्षात सुधारित प्रजातीचे सुमारे ५३ हजार ४०० नर मेंढे वाटप करण्यात येतील. त्यापैकी यावर्षी ५३४० नर मेंढे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचप्रमाणे मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या व ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा मेंढपाळांसाठी २० मेंढ्या व १ मेंढानर असलेल्या ५०० लाभार्थ्यांना (स्थायी ५०, स्थलांतरित ४५०) आणि ४० मेंढ्या व २ मेंढा नर असलेल्या ५०० लाभार्थ्यांना (स्थायी ५०, स्थलांतरित ४५०) मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. 

Web Title: 46 crore plan for the promotion of sheep farming business