महाराष्ट्र दिनाच्या (मेलेल्या आतडयापासून) शुभेच्छा..!

आकाश शिवदास चटके
सोमवार, 1 मे 2017

त्या तमाम शेतकरी, कामगार, कष्टकरी भावांच्या भगिनींच्या वतीनं तुम्हाला उच्चभ्रू लोकांना नेत्यांना, पुढार्यांना, पत्रकार, अभिनेते, उद्योजक, साहित्यिक, विचारवंत, समाजशेवक, कृषीतज्ञ, कृषीसल्लागार, खेळाडूंना, कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या मेलेल्या आतडयापासून शुभेच्छा .

स्टोरी चेसिंग करत फिरणारी ती भरकटली अन त्या अथांग माळावर पोचली..
विकेंड अन कामगार महाराष्ट्र दिनाच्या लागून आलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत..

तो तिथं बसलेला एकटाच..
चंद्र बघत.

ती म्हणली तू कोण
तो म्हणला मी विरलेला आवाज
ती म्हणली तू कुठला
तो म्हणला मातीच्या खालचा
ती म्हणली तू ईथं काय करतोयस
तो म्हणला शोधतोय विरलेला आवाज बुझलेलं अक्षर मोडलेली बाराखडी अन मिटलेली लिपी 

तीला त्याची मजा वाटली
ती म्हणली तुझ्याकडं सगळी उत्तरं आहेत? मग सांग शून्याचा शोध कसा लागला अन त्याचा अर्थ काय..?

तिच्या डोळ्यात त्याचे काळेभोर विवरं रोखून बघत तो सांगायला लागला गोष्ट.. म्हणला ऐक,
"कधी माणूसही राहायचा त्या तुझ्या मागच्या गुहेत..
करून खायचा..
पिकवायला राबायचा..
त्यानं पिकवलेलं एकदा धून गेलं वरनं वाहिलेल्या पाण्याच्या सैतानात, राहिलेलं जनावरानी तुडीवलं..
इथनं तो पहात हुता त्या ईजात, पूर्वजांनी जपल्यालं समदं सपाट झालेलं..
सगळं हातातनं गेलं बाकी शून्य राहीलं हे आमचा तो गुहेतला पूर्वज सुन्न नजरेनं सांगायचा प्रयत्न करायचा..
सुन्न होणं काहीच नसण्यावरचं व्यक्त होणं होतं म्हणून त्याला शून्य म्हणायचं !"

तिला म्हणला पुढच्या चंद्राला तुला गोष्ट सांगतो चुकलेल्या गणिताची अन सरकारनं शिकवलेल्या लाल बाराखडीची ..

ती म्हणली थांबवं हे 
तू लिपी पुन्हा मांडतोय...
मी भरकटतेय माझ्या धारणांपासून..
तुझं धोरण सरकारी नाहीयेचं मुळी.

तो हसला..
उठला आणि म्हणला,

सरकारनं मला हुकसवलंय माझ्या ७/१२-या वरनं
विचारवंतांनी मला सारलंय माझ्या ईन्फायनाईट पसरलेल्या आठवणीवरनं..
उद्योगांनी पळवलंय माझं अगणित क्युसेक्स घामाचं पाणी
समाजानं लुटलीय माझ्या तिची अब्रू सुख चुलीवरली गाणी..
सरकार समाज पुढारी उद्योजक विचारवंतांनी मला उलटं गाडलंय माझ्या अ-आ-ई मातीवर गिरवायलेल्या पोराच्या थडग्यावर
आता शिकवणाराय मी त्याला नवीन लिपी अक्षर ..

त्याला कुठं माहितीय तो मेलाय..
जित्यापनी पाटी देता आली नाही आता दिलीय पोटाची पाटी न बरगडी ची पेंशील..

माझी बाय भेटली कुठं अडकल्याली
तर निरोप दे पोरगं शिकतंय तुझं..
काळजी करु नगं, दुख गिळून जग..

येत जा डोंगरात लै भेटतील माझ्यावनी स्टोऱ्या..
समशानाच्या राखंतल्या
अन कबरीस्तानाच्या मातीतल्या
आम्ही फरक करत न्हाई गं
म्हणून गाडलो गेलो तिच्या मंगळसूत्रासहीत
बाभळीला माझ्या हातात हुतं माझ्या बायचं डोरलं
त्यांनी निष्कर्ष काढला मी भांडून तिला मारून फास घेतला
पर खरं सांगतो कांद्याच्या पट्टीतनं ते सोडवुन आणल्यालं
मला वसुली वाल्यांनी तुडवला
लैच लागल्यावर मान पडल्यावर झाडाला बांधला
अन माझ्या सातबाऱ्या वरनं मलाचं कोरा केला..

ती बघत राहिली शून्यात त्याच्या पूर्वजानं शोधलेल्या..

उठून अंधारात वाट तुडवत तो पुन्हा बाराखडी नव्यानं लिहायला निघाला..

--------------------

तो राज्याचा घटक होता.

10 टक्क्यानं कर्ज काढून एकरात कसातर कांदा लावला.
घागरी-घागरीनं जगवला.
बारदाण्याचं फेडायला अन उरल्यालं दिस घालवायला शेवटी एकराचा तुकडा नंदीवाल्याकडं घाण टाकून आला.

पहिल्यांदाच डाळींबाचा घाट घातला,
१२० वरनं १२-१५ वर रेट आला,
काढायला सुदिक परवडीना म्हणून रात्री दिवसाचा तोडतोय एकटाच ..
प्रधान म्हणलेले लोकांना स्वस्त खायला देतो, पालीकडच्या द्राक्ष वाल्याचा आणि याचा तिसरा लागोपाठ आला.

जनावराला टाकलेल्या कोथिंबीर शेपू मेथी टमाटी चा वास येणाऱ्या रस्त्यांनं जाणार्या गाड्यातल्या लोकांना समृद्धीचा वाटतोय..

तुरीवर जगण्याचा डाव खेळला त्यांच्या कफनाला बारदाना गेला.

जगायच्या शर्यतीत पळताना त्याला बघायला कोण नव्हतं. ना टाळ्या वाजवायला ना उचलायला.
रातच्याला वावरात गेला.
आलाच नाही.
 
....
नोटबंदीनं रोजगार गेलेले कामगार मजूर , निर्यातबंदीनं लुबाडून खाल्लेला शेतकरी.
....
 
त्यांच्या जमिनीवर धरणांचा घाट घातला, त्यानं त्यासाठी सोडल्या जमिनी, विस्थापित झाला, आज धरण बांधील झाली उद्योगांची. जमिनी पुन्हा घेतल्या गेल्या उद्योगांना, घेतल्या जातायत अन घेतल्या जातील त्याला पाय ठेवायला शिल्लक राहणार नाही तोपर्यंत.

....

वीझतात या चुली त्यांच्या धनीला
पण विसावतील कायमच्या आता तिसऱ्यानंतरही
तिला फुंकर घालणारी शेवटची ती सुद्धा संपलीय
हुकसून लावलीय त्याच्या समाधीला उखडून फेकत
तिच्या पदरावरून समृद्धीचा रस्ता जाणार आहे,
अन त्याच्या थडग्यावर नवशहरं उभी राहणार आहेत.
 
शेवटची ती उचलून नेली जाणार आहे शहरांच्या लखलखाटात प्रदर्शित ठेवायला.
 
..........
 
त्या तमाम शेतकरी, कामगार, कष्टकरी भावांच्या भगिनींच्या वतीनं तुम्हाला उच्चभ्रू लोकांना नेत्यांना, पुढार्यांना, पत्रकार, अभिनेते, उद्योजक, साहित्यिक, विचारवंत, समाजशेवक, कृषीतज्ञ, कृषीसल्लागार, खेळाडूंना, कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या मेलेल्या आतडयापासून शुभेच्छा .
 

Web Title: Aakash Chatake's blog on Maharashtra Day